नांदेड : बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरु करा; अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा

प्रल्हाद कांबळे
Monday, 22 February 2021

मुख्यमंत्र्यांकडे बहूजन मजूर कामगार आघाडीची मागणी

नांदेड : शासनाने औद्योगिक वसाहतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करुन भांडवलदारांना उद्योग चालविण्यासाठी दिल्या, परंतु भांडवलदारांनी उद्योग न चालवता ते उद्योग बंद पाडले. बंद पडलेले ते उद्योग पूर्ववत चालू करावेत, अन्यथा भांडवलदारांचा त्या जमिनीवरील मालकी हक्क रद्द करुन त्या जमिनी मूळ मालकांना परत देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स प्रणित बहुजन मजूर कामगार आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.

औद्योगिक वसाहतींमध्ये ज्या अटीवर भांडवलदारांना जमिनी दिल्या, त्या अटी अथवा मूळ हेतूच बाजूला पडला आहे. प्रत्यक्षात निम्म्याच्यावर उद्योग आजघडीला बंद पडलेले आहेत. एक तर शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतींच्या नावाखाली कवडीमोल भावाने खरेदी करुन त्यांच्या वारसांना भूमीहीन केले आणि दुसरे म्हणजे उद्योग बंद पाडून कामगार लोकांवर उपासमारीची वेळ आणली. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा या प्रश्नावर अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स प्रणित बहुजन मजूर कामगार आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर नामदेव झुंजारे, बाबू शिंदे, अरुणा बाबळे, प्रतापसिंह ठाकूर, राम बाबळे, गणपत गोमसकर, गौतम मांजरमकर, पंडित सोनकांबळे, अवधुत कांबळे, संजय दासरवाड, संभाजी मेकाले, विठ्ठलराव चिंचोले, दादाराव कांबळे, अशोक गोमसकर, मारोती रोडे, परमेश्वर सूर्यवंशी, राजहंस किनीकर आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Restart closed factories; Otherwise return the lands to the farmers nanded news