नांदेड : भवानी चौक वाडी (बु) ते लिंबगाव पर्यंतचा मार्ग सकाळी सायकलपटूंसाठी सुरक्षित

प्रल्हाद कांबळे
Friday, 9 October 2020

सायकलपटूंसाठी आता भवानीचौक वाडी (बु) ते लिंबगाव पर्यंतचा मार्ग सकाळी 6 ते 9 याकाळात सायकलपटूंसाठी सुरक्षित करण्याची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.

नांदेड  : “फिट इंडिया मुव्हमेंट” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टिने सायक्लिंग क्रीडा प्रकाराला चालना मिळावी आणि युवक व क्रीडाप्रेमींच्या अंगी क्रीडा कौशल्यासह सुदृढ आरोग्याबाबत जागृती व्हावी यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. यादृष्टिने सायकलपटूंसाठी आता भवानीचौक वाडी (बु) ते लिंबगाव पर्यंतचा मार्ग सकाळी 6 ते 9 याकाळात सायकलपटूंसाठी सुरक्षित करण्याची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे. यासंदर्भात नांदेड शहरातील क्रीडाप्रेमी, सायकलपटू व जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी केली होती.

 

याअनुषंगाने निर्णय घेण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत, तहसिलदार किरण अंबेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ग. ही. राजपूत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे उपस्थित होते.  

9 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत

बैठकीत विचार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने भावनी चौक (निळा जंक्शन) वाडी (बु) नांदेडपासून लिंबगाव पर्यंतचा रस्ता 9 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत सायकलींगसाठी सुरक्षित राहिल. या कालावधीत मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 नुसार अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने, शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंधीत असतील. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून लिंबगाव-नाळेश्वर- वाघी- नांदेड हा मार्ग उपलब्ध असेल. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने (एलएमव्ही) वगळता उर्वरीत सर्व जड वाहनास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The road from Bhavani Chowk Wadi (Bu) to Limbgaon is safe for cyclists in the morning nanded news