
न्यायालयाच्या आदेशावरून इतवारा पोलिस ठाण्यात चार जणांवर फसवणूकीसह अन्य कलमान्वये शनिवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जोधासिंग गहलोत, बिरजूसिंह गहेरवार, भीमसिंह कौशिक आणि बद्रीसिंह काथी (ठाकूर) यांचा समावेश आहे.
नांदेड : शहरातील श्री क्षत्रिय समाज रेणुकादेवी मंदिर गाडीपूराच्या तत्कालीन संचालकांकडून संस्थेची फसवणूक करीत तब्बल ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून इतवारा पोलिस ठाण्यात चार जणांवर फसवणूकीसह अन्य कलमान्वये शनिवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जोधासिंग गहलोत, बिरजूसिंह गहेरवार, भीमसिंह कौशिक आणि बद्रीसिंह काथी (ठाकूर) यांचा समावेश आहे.
गाडीपूरा येथील श्री क्षत्रिय समाज रेणुका देवी मंदिर या धार्मिक संस्थेची आर्थिक उलाढाल कोट्यवधींची आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेवर आतापर्यंत अनेक संचालक होऊन गेले. प्रत्येक संचालकांच्या काळात संस्थेच्या आणि मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. जोधासिंह शंकरसिंह गहलोत, बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार, भिमसिंह हनुमानसिंह कौशिक आणि बद्रीसिंह दगडूसिंह काथी (ठाकूर) यांनी संचालक मंडळात असताना वैयक्तिक हितासाठी संस्थेच्या मोठ्या रकमा हडप केल्या. संस्थेच्या जमा खर्चात कोणत्याही नोंदी न करता तब्बल ४७ लाख नऊ हजार ५७५ रुपयांचा अपहार केला. तब्बल पाच वर्षापासून संस्थेच्या खोट्या नोंदी तयार करीत वरील चारही जणांनी संस्थेत गैरव्यवहार केला. एवढेच नाही तर खोटे दस्त तयार करून धर्मादाय आयुक्तांचीही दिशाभूल केली.
हेही वाचा - नांदेड : केळीचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी अडचणीत -
इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संस्थेत भ्रष्टाचार आणि संबंधीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी संस्थेचे नुतन सचिव गणेशसिंह हनुमानसिंह ठाकुर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे आणि उपरोक्त चार जणांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यानंतर न्यायालयाने जोधासिंह शंकरसिंह गहलोत, बिरजूसिंह भिक्कमसिंह गहेरवार, भीमसिंह हनुमानसिंह कौशिक आणि बद्रीसिंह दगडूसिंह काथी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशावरून इतवारा पोलिसांनी वरील चारही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच अपहार करण्यात आलेली ४७ लाख नऊ हजार ५७५ रुपयांची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत. धार्मिक क्षेत्रातील सर्वोत्तम कार्य करणाऱ्या श्री क्षत्रिय समाज रेणुका देवी मंदिराच्या संचालकांनी केलेल्या अपहरणानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. अपहार करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मंदिराचे सचिव गणेशसिंह ठाकूर यांनी केली आहे.