
नांदेड : वाळूच्या ट्रकने धडक दिलेल्या युवकाचा अखेर मृत्यू
लोहा : अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने सकाळी मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या २४ वर्षीय महाविद्यालयीन युवकास शनिवारी एप्रिल रोजी जोराची धडक दिली होती. यात तरुणास गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मागील चार दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी अखेर तरूणाची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे तरुणाचा जीव घेणारा टिप्पर पोलिसांना अजूनही सापडला नाही. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी दुपारी तरुणाचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मागील काही महिन्यात लोहा तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रारी करूनही महसुल विभागासह पोलिस यंत्रणेकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हप्तेशाहीने बोकाळलेल्या या अवैध वाळू वाहतुकीवर कोणाचाच वचक राहिला नाही. परिणामी वाळू वाहतूक करणारी वाहने नागरिकांसाठी यमदुत ठरत आहेत.
सोनवळे यांचा मुलगा बसवराज हा बीएस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. अपघात होऊन चार दिवस उलटले तरी तरूणाचा जीव घेणाऱ्या टिप्परचा पोलिस व महसुल यंत्रणेने अजून शोध घेतला नाही. यामुळे संतप्त - झालेल्या नातेवाईकासह नागरिकांनी दुपारी बाराच्या सुमारास तरुणाचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून अंत्यविधी करण्यास नकार दिला. तरुणाच्या मृत्युस कारणीभूत असणाऱ्यांवर कावाई करावी, त्या टिप्परचा शोध तत्काळ घ्यावा अशी मागणी करित कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.