नांदेड : सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर खंजीर ठेवून सराफा दुकान फोडले; सहा लाखावर ऐवज लंपास, चोऱ्यांची मालिका थांबेना

बा. पू. गायखर
Monday, 15 February 2021

तेथील सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर खंजीर ठेवून एका दुकानातील जवळपास साडे पाच लाखावर व दुसऱ्या दुकानातील 50 ते 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लुटला. याप्रकरणी लोहा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोहा ( जिल्हा नांदेड ) : मागील काही काळापासून लोहा शहरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दुकानासह इंदिरानगर, बालाजी मंदिर, शिवाजी चौक, मराठगली येथिल रहिवासी घरांना त्यांनी टार्गेट बनवले आहे. त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहने तसेच आठवडी बाजारात मोबाईल लांबवण्याच्या घटनाही आता नित्याच्याच बनल्या आहेत. रविवारी (ता. १४ ) पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास लोहा शहरातील सराफा मार्केटवर चोरट्यांनी हल्ला चढविला. तेथील सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर खंजीर ठेवून एका दुकानातील जवळपास साडे पाच लाखावर व दुसऱ्या दुकानातील 50 ते 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लुटला. याप्रकरणी लोहा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोहा शहर व तालुक्यात सद्यस्थितीला चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून त्यांनी आपला मोर्चा रहिवासी ठिकाने, दुकाने चारचाकी वाहनाकडे वळविला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर दोघांनी खंजीर ठेऊन इतर चोरट्यांनी सराफा मार्केटमधील श्यामकांत व्यंकटराव पांचाळ यांचे लक्ष्मी नरसिंह ज्वेलर्सच्या शटरचे कुलूप तोडून सोन्या- चांदीचे जवळपास साडेपाच लाख रुपयांचे दागिने तसेच शेजारील राजू मारोतीराव कल्याणकर यांचे अभिषेक ज्वेलर्स यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून यातील 50 ते 60 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवले. तिसऱ्या दुकानाचे शटर तोडण्याचा चोरट्यांनी अतोनात प्रयत्न केला मात्र डबल गेट असल्याकारणाने त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. 

हेही वाचाऔंढ्यात मटक्यावर पोलिसांची कारवाई 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; सात आरोपी अटकेत

सदर घटना पोलिसांना पहाटे पाच वाजता सराफा व्यापाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच नांदेडहून श्वान पथकासह फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावून घेतले. सकाळी सात वाजेदरम्यान श्वानपथक तसेच फिंगर प्रिंट तज्ञ लोहा शहरात दाखल झाले. दोन्ही दुकानापर्यंत तसेच मुख्य रस्त्यापर्यंत पोलिसांचे श्वान आले मात्र त्यापुढे चोरट्यांचा माग त्यास काढता आला नाही. मात्र फिंगरप्रिंट तज्ञांना सदरील सराफा दुकानात चोरट्यांचे फिंगरप्रिंटचे नमुने आढळून आल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीला लोहा शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाल्याने लोहा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोहा पोलिस कोणत्या कामात व्यस्त आहे हे समजत नाही. पोलिस जनतेच्या रक्षणासाठी असताना चोरट्यांची हिम्मत अशी कशी वाढू शकते ? कारण लोहा पोलिसाचा आरोपीवर दबदबा राहीला नाही. असाही दबक्या आवाजातील सूर समोर येत आहे. पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी करुन सराफा मार्केटमधील चोरी प्रकरणातील चोरट्यांचा तपास करुन चोरीला गेलेल्या सराफ्यांचा ऐवज तात्काळ मिळवून द्यावा. लोह्यातील चोरीच्या घटनेकडे जिल्हा पोलिस अधीक्षकानी लक्ष द्यावे अशी मागणी लोहा शहरातील सराफा व्यापाऱ्यातून व सुजाण नागरिकातुन होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A security guard broke into a bullion shop with a dagger around his neck; looted over six lakhs, a series of thefts will not stop nanded news