नांदेड : मोक्कातील आरोपी पोलिस कोठडीत, जुना मोंढा परिसरात केला होता गोळीबार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 19 December 2020

यातील सहा आरोपींना कारागृहातून अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश एस. एस. खरात यांनी त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : पिस्तुल व खंजरचा धाक दाखवून व्यापारी व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीकडून खंडणी उकळणारी टोळी मागील काही वर्षापासून कार्यरत होती. या खंडणीखोर आरोपींवर नुकताच इतवारा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला होता. यातील सहा आरोपींना कारागृहातून अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश एस. एस. खरात यांनी त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

ता. चार ऑक्टोबर रोजी जुना मोंढा परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या सहा युवकांवर इतवारा पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी भेट दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकांनी ता. १६ ते २१ आॅक्टोबर दरम्यान आरोपींना अटक केली. तेंव्हापासून ते कारागृहात होते.

हेही वाचा - परभणी : बिबट्याच्या भीतीने आखाडे पडले ओस, गंगाखेड तालुक्यातील स्थिती

याबाबत व्यापारी विजय मोहनदास धनवानी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात विशाल गंगाधर आंबे (वय २२) राहणार शिवशक्तीनगर कलामंदिरजवळ नांदेड, आदर्श उर्फ आद्या अनिल कामठेकर (वय २०), संजू किशन गुडमलवार (वय २४), धनराजसिंह उर्फ राणा दीपकसिंह ठाकुर (वय १८) राहणार शिवशक्तीनगर कलामंदिर, लखन दशरथसिंह ठाकुर (वय २८) राहणार चिखलवाडी, प्रसाद नागनाथ अवधूतवार (वय १९) राहणार चिखलवाडी या सर्वांनी संगणमत करुन पिस्तुलचा वापर करत आकाशसिंह राजेशसिंह परिहार याला जखमी केले होते. तसेच धनवाणी यांच्या दुकानातील दहा हजार रुपयाची लूट केली होती. 

त्यांच्याविरुद्ध मोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण कायद्याप्रमाणे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे वर्ग झाला. त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गंगाराम जाधव आणि तिरुपती तेलंग यांनी या मोक्का न्यायालयात ता. १७ डिसेंबर रोजी सर्व सहा आरोपींना मोक्का कायद्यानुसार अटक केली. या सहा आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करुन तपासासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. न्यायाधीश एस. एस. खरात यांनी या सहा आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडीत पाठविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Six accused in Mocca were shot dead in the police custody at Old Mondha area nanded news