नांदेड : बेकायदा वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडले; तेलंगणातून महाराष्ट्रात आणली जात होती वाळू

सद्दाम दावणगीरकर
Thursday, 4 March 2021

ही कार्यवाही बुधवारी (ता. तीन) रोजी पहाटे दोनच्या सुमारास मरखेल पोलिसांनी तेलंगणा सीमेवरील येरगी गावात केली आहे.

मरखेल (जिल्हा नांदेड) : सीमावर्ती तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही केली आहे. वरील सहा ट्रॅक्टर वाळूसह मरखेल ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांवर महसूल विभागाच्या वतीने कार्यवाही करून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. ही कार्यवाही बुधवारी (ता. तीन) रोजी पहाटे दोनच्या सुमारास मरखेल पोलिसांनी तेलंगणा सीमेवरील येरगी गावात केली आहे.

मरखेल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील येरगी (ता. देगलूर) येथे तेलंगणा राज्यातील हजगुल (जिल्हा निझामाबाद) येथून काहीजण अवैध व बेकायदा वाळूची वाहतूक करुन महाराष्ट्रात आणत असल्याच्या माहितीवरुन मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार प्रभाकर कदम, अंगद कदम, राजेंद्र वाघमारे, विष्णूकांत चामलवाड, नारायण येंगाले आदींनी सापळा रचून ट्रॅक्टर (टी. एस. १७ एफ. ३१५६, टी.एस. १६ युए. ५०५६, टी. एस. १७ जी. ३११४, टी.एस. १७ बी. ८१६४, टी.एस. १७ टी. ७३७३) व अन्य एक विनानंबर असलेल्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करीत, सर्व ट्रॅक्टर जप्त करुन मरखेल ठाण्यात लावण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव रखडलेला आहे. याशिवाय या भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेसह नव्याने राहण्यासाठी निवारा बांधण्याची इच्छा असलेल्या लोकांची कामे वाळूअभावी प्रलंबित आहेत. परिणामी मिळेल त्या ठिकाणाहून बेभाव वाळूची खरेदी करुन आपल्या हक्काचा निवारा बांधण्यासाठी नागरिक प्रयत्नशील आहेत. परिणामी वाळू तस्करांचे चांगलेच फावले असून, सीमावर्ती येरगी, माळेगाव (म.), मानूर, येडूर, भुत्तनहिप्परगा आदी ठिकाणी तेलंगणा राज्यातील तस्कर पैशाच्या मोहापायी वाळू वाहतूक करताना दिसून येत आहेत. परिणामी शासनाचा महसूल बुडत असतानादेखील देगलूरच्या तहसील कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिकांना याचा मार सहन करावा लागत आहे. मरखेलचे तलाठी सय्यद इरफान, येरगी सज्जाचे तलाठी श्री. शिंदे यांनी पंचनामा केला असून, महसूल विभागाच्या नियमावलीनुसार कार्यवाही व दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Six tractors transporting illegal sand seized; Sand was being brought to Maharashtra from Telangana