esakal | नांदेड: वाळकीत ‘एक दुजे के लिए’ म्हणत प्रेमी युगलांची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वाळकी ते कापसी रोडलगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. याघटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी उस्माननगर पोलिसांना दिली. त्यांनी मृतदेह बाहेर काढत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कापसी आरोग्य केंद्रात पाठविले.

नांदेड: वाळकीत ‘एक दुजे के लिए’ म्हणत प्रेमी युगलांची आत्महत्या

sakal_logo
By
गणेश ढेपे

मारतळा (जिल्हा नांदेड) : लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथील प्रेमी युगलांनी ‘एक दुजे के लिए’ म्हणत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१८) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आल्याने, परिसरात एकच खळबळ उडाली. वाळकी ते कापसी रोडलगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. याघटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी उस्माननगर पोलिसांना दिली. त्यांनी मृतदेह बाहेर काढत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कापसी आरोग्य केंद्रात पाठविले.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाळकी बुद्रुक येथील कोमल श्रीकांत कोलते (वय १९) व धनाजी मुकिंद कोलते (वय २२) या दोघांचे काही दिवसांपासुन प्रेमसंबंध असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. पण चार महिन्यापूर्वीच कोमलचा विवाह अर्धापूर येथे लावून दिला होता. तरीही या दोघांचे प्रेमसंबंध चालूच होते. नात्यामुळे दोघेही भावकी लागत असल्याने दोघांना लग्नही करता येईना व पळूनही जाता येईना अशा व्दिधा मनस्थिती होती. अशातच दिवाळीच्या सणासाठी ती माहेरी आली असता दोघांनी जगायचे तर एकत्र अन् मरायचे तर एकत्र म्हणत एकमेकांच्या हातांना एकत्र घट्ट बांधुन विहिरीत उडी घेउन जीवनयात्रा संपविली.

दरम्यान धनाजी कोलते हा बीए तृती़य वर्षात शिकत होता. तर कोमल बारावीपर्यंत शिकलेली आहे. दोघाचीही घरे एकमेकांच्या समोरासमोर आहेत. त्यातच आई-वडीलांनी भावकीचा मुलगा व आपली मुलगी यांचे लग्न करता येत नसल्यामुळे अर्धापूर येथील पाहुण्याच्या मुलासोबत  लॉकडॉऊनमध्ये तिचे लग्न लाऊन दिले होते. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध अजुनही चालूच होते. दिवाळीसणानिमित्त ती माहेरी आली होती. त्यातच जगायच तर दोघांनी अन् मरायचे दोघांनी सोबतच म्हणत जीवनयात्रा संपविली. दोन दिवसांपासून दोघेही घरातून निघून गेलेले होते.  विहिरीच्या परिसरात दुर्गंधी येत होती.

शेतकऱ्याने आत पाहिले तर दोन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी स्वत:च्या मर्जीने आत्महत्या करत असून, कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये म्हणत, एकमेकांशिवाय आम्ही जगू शकत नाही असे नमूद केले आहे.
उस्माननगर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करत दोघांचेही मृतदेह कापसी प्राथमिक आरोग्य केंद्रीत पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सदरप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिली. या वेळी उस्माननगर ठाण्याचे पी.बी. थोरे व कर्मचारी हजर होते.

संपादन - स्वप्नील गायकवाड