
तरोडा नाका परिसरात गादी घराला आग
नांदेड : तरोडा नाका परिसरात असलेल्या एका गादी घराला शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. त्यानंतर लगेच त्याच्या बाजूला असलेल्या चिकन सेंटरला व इतरही दुकानांना आगीने घेरल्याने ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे लोळ आणि गर्दी लक्षात घेता अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा यांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यात जीवीतहानी झाली नसली तरी अंदाजे २० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या टीन पत्र्यामधील एका गादी घराला दुपारच्या दरम्यान आग लागली. त्याच्याशेजारी असलेल्या चिकन सेंटरच्या दुकानालाही आगीने आपल्या कवेत घेतले. चार ते पाच दुकानांना आग लागल्याने आगीचा लोळ व धूर मोठ्या प्रमाणात दिसत होता. प्रत्यक्षदर्शीनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही घटना भ्रमणध्वनीवरून कळवली. अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा यांनी स्वतः गाडी चालवत घटनास्थळी दाखल झाले.
सोबत दुसरी गाडीदेखील त्यांनी पाचारण केली. दोन गाडीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीमध्ये जवळपास २० लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जवळपास दीड महिन्याच्या काळात शहरात आग लागल्याच्या एकूण ४६ घटना घडल्या आहेत.
शनिवारी शहरामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्ती दाखल होणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमक दलाची बैठक चालू होती. परंतु सदरील घटना कळताच कुठल्याही क्षणाचा विलंब न करता रईस पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणल्याने नागरिकांनी पाशा यांचे अभिनंदन केले. महापालिकेच्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नेहमीच या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Web Title: Nanded Taroda Naka Fire At Mattress House Chicken Shop
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..