
शहराच्या विष्णुनगर परिसरातील ईश्वरनगर येथील संदीप गंगाधर जाधव (वय २२) हा बाहेर गावी कामानिमित्त राहत होता
नांदेड : जुन्या वादातून मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी मंगळवारी (ता. २३) जन्मठेप प्रत्येकी एक हजार ७०० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात शिक्षा झालेल्यांचे नातेवाईक हजर होते.
शहराच्या विष्णुनगर परिसरातील ईश्वरनगर येथील संदीप गंगाधर जाधव (वय २२) हा बाहेर गावी कामानिमित्त राहत होता. तो नुकताच आपल्या आई- वडिलांना भेटण्यासाठी आला होता. ता. चार जून २०१८ रोजी तो सायंकाळी दुकानावर जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला. यावेळी त्याच्या पाळतीवर असलेल्या अंकुश सिद्धार्थ तारु (वय २१), शैलेश पिराजी कसबे ( वय २१), अजय उर्फ टकल्या विजय जोंधळे ( वय १९) आणि इतर चार जणांनी संगनमत करुन संदीप जाधव याला रस्त्यात अडविले. जुन्या वादातून त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या पोटावर, छातीवर, डोक्यात खंजरने जबर वार केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला.
त्याच रात्री दहा वाजताच्या सुमारास मृत्यू
घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीप जाधव याला पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा त्याच रात्री दहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
मारेकऱ्यांविरुद्ध खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
गंगाधर गणपत जाधव यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरील मारेकऱ्यांविरुद्ध खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी यातील सर्व मारेकऱ्यांना अटक केली. त्यातील दोन विधीसंघर्ष आरोपी होते. तर दोघेजण फरार झाले. या घटनेचा तपास करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने यात १३ साक्षिदार तपासले. सबळ पुरावे व वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायाधीश खरात यांनी शैलेश कसबे, अजय जोंधळे आणि अंकुश तारु या तिघांना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार ७०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्ष्याची बाजू अॅड. संजय लाठकर यांनी मांडली.