नांदेड : देगलूरमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून मातेसह तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

अनिल कदम
Tuesday, 5 January 2021

शहाजीनगर भागात घडलेल्या घटनेने देगलूरात हळहळ

देगलुर (जिल्हा नांदेड) : शहरातील साई भोजनालय चालवणाऱ्या कुटुंबातील मातेसह मुलाचा पाण्याच्या टाकीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता. चार) जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी शहरात उलटसुलट चर्चेला ऊत आला असून घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान देगलूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शहरातील शहाजीनगर भागात राजेश निलावार यांचे व्यापारी कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर भुतंनहिप्परगा येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या शहरातील रामपूर रोडवरील गणेशनगर येथे वास्तव्यास असलेले मठपती कुटुंब साई भोजनालय चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

हेही वाचाGram Panchayat Election : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतसाठी ७८६१ उमेदवार निवडणूक रिंगणात, ६२ ग्रामपंचायत बिनविरोध 

सोमवारी (ता. चार) रोजी दुपारी मठपती कुटुंबातील शिवलीला साईनाथ मठपती (वय २३) व तिचा मुलगा प्रज्योत साईनाथ मठपती (वय तीन वर्षे) हे दोघे चौथ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मृतावस्थेत तरंगत असताना आढळून आले. 

दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी नातेवाईकाची मोठी गर्दी होती.
याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी प्रीतम राऊत यांच्या माहितीवरुन देगलुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार श्रीमती सांगळे करत आहेत. 

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A three-year-old boy along with his mother drowned in a water tank in Deglur nanded news