
नांदेड ते भूज गुजरातपर्यंत एक्स्प्रेस सुरू करावी
नांदेड : गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी नांदेडला येत असतात. सर्वच राज्यांतील भाविकांसाठी रेल्वेची व्यवस्था असून, गुजरातमधील भाविकांसाठी नांदेड ते भूज गुजरातपर्यंत साप्ताहिक एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी, अशी मागणी गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता.२१) केली आहे.
निवेदनात म्हटले की, शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंघजी महाराज यांचे गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर साहेब नांदेड हे पवित्र स्थान आहे. त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नांदेडमध्ये येतात. त्यासाठी भारत सरकारने रेल्वे सुरु केलेल्या आहेत. त्यामध्ये अमृतसर-सचखंड एक्सप्रेस (दररोज), जम्मू तवी (साप्ताहिक), राजस्थान येथून श्री गंगानगर (त्रिदिवसीय), कोलकत्ता येथून सांतराकांची (साप्ताहिक), बिहार येथून पटना-नांदेड (साप्ताहिक), ऊना साहिब येथून हमसफर एक्स्प्रेस (साप्ताहिक) आदी रेल्वेंचा समावेश आहे. मात्र, गुजरात भूज येथून एकही रेल्वे चालवली जात नसल्याने तेथील भाविकांना नांदेडला दर्शनासाठी येण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नांदेडला गुजरातशी जोडण्यासाठी नांदेड व्हाया मनमाड मार्गे भूज गुजरातसाठी एक साप्ताहिक एक्स्प्रेस चालवावी, अशी विनंती निवेदनामध्ये बोर्डाचे प्रभारी अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी केली आहे.