
नांदेड : भूमिगत पाइपलाइन फुटल्याने तीन दिवसांपासून निर्जळी
देगलूर : देगलूर शहराला करडखेड मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी रोजी करडखेड येथुन शहराला जोडणाऱ्या ६०० मिमी व्यासाची भुमीगत सिमेंट पाइपलाइन फुटल्याने देगलूर शहराचा पाणीपुरवठा बंद झाला असून त्यामुळे शहरवासियांना तीन दिवस निर्जळीला तोंड देण्याची वेळ आली आहे. लिकेज दुरुस्त करण्यासाठी औरंगाबादहून यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले असून टेक्निशिअन शुक्रवारी रोजी उशिरा येऊन प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. ही पाइपलाइनचे पाईप सध्या बनवण्याचे काम कुठेच नसल्याने ही हे पाइप मिळत नाही, त्यामुळे जुने असलेलेच पाईप दुरुस्ती करून हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे रविवारी दुपारी नंतरच हे काम पूर्णत्वास जाईल त्यानंतरच शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
शुक्रवारी शहरात पाणी न आल्याने अनेकांची तारांबळ उडाली असून नागरिकांना पाण्यासाठी बोर असणाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली तर अनेकांनी पाणी विकत घेतले. एैन उन्हाळ्यात शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
करडखेड प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा
करडखेड प्रकल्पात सध्या ७० टक्के पाणीसाठा असून सध्यस्थितीत शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा एक महिन्यावर असल्याने एक दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठा करावा अशी शहरवासीयांची मागणी आहे. चाळीस वर्षापूर्वी टाकलेली ही पाइपलाइन असल्याने फार जुनी झाली आहे. टाकण्यात आलेले पाईपची निर्मिती होत नसल्याने ते उपलब्ध होत नाहीत, आपल्याकडे असलेले जुने पाईप बसवण्यासाठी इतरत्र ठिकाणाहून काढून त्या ठिकाणी बसवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून रविवारी सकाळ पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल. रविवारी रोजी सायंकाळपासून शहरवासीयांना पूर्ववत सुरळीत पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- गंगाधर ईरलोड, मुख्याधिकारी, नगरपरिषद देगलूर.