esakal | नांदेड : आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो- भास्कर पेरे पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर बालाजी कदम होते. यावेळी बोलताना भास्कर पेरे पाटील म्हणाले की, आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो. त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही

नांदेड : आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो- भास्कर पेरे पाटील 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जिल्हा नांदेड) : धामदरी (ता. अर्धापूर) येथील उपक्रमशील शेतकरी तथा आत्मनिर्भर किसान उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दत्ता पाटील धामदरीकर यांच्या या ३६ व्या वाढदिवसानिमित्त आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या आदर्श गाव संकल्पना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर बालाजी कदम होते. यावेळी बोलताना भास्कर पेरे पाटील म्हणाले की, आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो. त्यासाठी शासनावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. सरपंचांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक सरपंचावर विश्वास ठेवतात. या पद्धतीने मी माझ्या पाटोदा गावात कामे केली आहेत. म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे. सरपंचाने गावासाठी करावयाची पंचसूत्री त्यांनी सांगितली. पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे, पावसाच्या व सांडपाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, गाव व परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे, मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे, गावातील निराधारांना आधार दिला पाहिजे यासह गावकऱ्यांनीही १०० टक्के कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. सरपंचाने गावकऱ्यांना सुविधा पुरवणे हे सरपंचाचे आद्यकर्तव्य आहे. असेही यावेळी पेरे पाटलांनी सांगितले.

हेही  वाचा नांदेड : शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

भास्करराव पेरे पाटील यांनी मार्गदर्शन शिबिरानंतर धामदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील परसबाग व भौतिक सुविधा पाहून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत संभाजी कदम यांचे कौतुक केले. या शिबिरासाठी माजी उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले,  प्रल्हाद इंगोले , देगावचे सरपंच भगवान कदम, ईश्वर इंगोले, प्रशांत आबादार, वसमत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कऱ्हाळे, संतोष गव्हाणे, नागोराव भांगे पाटील, नामदेव दळवी, पंडीत कदम, मारोतराव गव्हाणे पाटील, दामोदर हनमंते, विलास झोडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ  कदम यांनी केले. अध्यक्षीय समारोप मुरलीधर बालाजी कदम यांनी केला तर दत्ता पाटील यांनी आभार मानले.

संपादन-  प्रल्हाद कांबळे