
नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागात बुधवारी रात्री तसेच गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. ढगफुटी सदृष्य पाऊस सकाळी सात ते आठ या वेळेत झाल्यामुळे नांदेड तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. उमरी, लोहा, अर्धापूर, मुदखेड, कंधारमध्ये जोरदार झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढत आहे.
नांदेडमध्ये जूनमध्ये झालेल्या जेमतेम पावसानंतर जुलेमध्ये मात्र रेकार्डब्रेक पाऊस झाला. जुलै महिन्यात पडणार्या पावसाच्या तब्बल २४८ टक्क्यानुसार तब्बल ६०६ मिलीमीटर पाऊस झाल्याने जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होवून खरिपासह बागायती व फळपिकांचे जवळपास साडेतीन लाख हेक्टरचे नुकसान झाले होते. यानंतर ऑगस्टमध्ये दिलासा वाटेल असे वाटत असताना जिल्ह्यात ठराविक दिवसानंतर मुसळधार पाऊस पडत आहे.
हा पाऊस काही वेळात मुसळधार होत असल्याने नदी-नाले एक होवून पिके पाण्याखाली जात आहेत. मागील रविवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी (ता. तीन) दुपारनंतर तसेच गुरुवारी (ता. चार) पहाटे नांदेड, उमरी, लोहा, अर्धापूर, मुदखेड, कंधार तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. काही मिनिटात झालेल्या या पावसामुळे नदी - नाल्यांना पूर येवून शेतात पाणी साचत आहे. परिणामी खरिपातील नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
मागील आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल (ता. तीन) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार सुरुवात केली. पाण्याचा जोर जवळपास एक तास सुरुच होता. नंतर काही काळ पाऊस थांबला पण पुन्हा काही वेळाने पावसाने जोर धरला. आज सकाळी पाच वाजेपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी साचले. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरलेले होते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली स्वच्छता आणि साफसफाईचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.
चार मंडळात अतिवृष्टी
गुरुवारच्या पावसामुळे नांदेड तालुक्यातील वसरणी मंडळात ७८.९० मिलीमीटर, वाजेगाव मंडळात ६८.८० मिलीमीटर, विष्णुपुरीमध्ये ६८ मिलीमीटर तर तुप्पा मंडळात ६५.८० मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे याठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. यासोबतच मुगटमध्ये ६०.३०, नांदेड शहर ४९.३०, नांदेड ग्रामिण ४९.३०, कापसी ४३.८०, तरोडा ३८.५०, नाळेश्वर ३८ मालेगाव ३५.८०, दाभड ३४.५०, फुलवळ ३२.८०, उस्माननगर ३२.५०, पेठवजड २९.५० मिलीमीटर पाऊस झाला.
खरिपातील पिकांचे नुकसान वाढले
गुरूवारी (ता. चार) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून मानवी वस्तीपर्यंत पुराचे पाणी घुसले. उमरा गावापासून ढगारी तांडा, परमेश्वर तांडा, सुगाव, लाडका, धनंज खूर्द, वाळकी खूर्द, कापसी खूर्द, या गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढत आहे.
नांदेड शहरात पाणीच पाणी
विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरूवारी सकाळी चांगलेच झोडपून काढले. पहाटे सहा वाजल्यापासून सतत दोन तास झालेल्या पावसाने शहरातील बाबानगर, शाहुनगर, आनंदनगर, वसंतनगर, गोकुळनगर, वजीराबाद, डॉ. आंबेडकरनगर, श्रावस्तीनगरसह अन्य काही सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. हेच पाणी अनेकांच्या घरात शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.