Nanded Lok Sabha Election 2024 : नांदेडला २६ एप्रिलला मतदान होणार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात ता. २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
Nanded will go to polls on April 26 Collector Abhijit Raut lok sabha election 2024
Nanded will go to polls on April 26 Collector Abhijit Raut lok sabha election 2024Sakal

नांदेड : लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात ता. २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

ता. चार जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी (ता. १६) जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली.

नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका होणार असून दुसरा टप्पा ता. २६ एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली या मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

तर लातूर लोकसभेसाठी ता. सात मे रोजी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर व दक्षिण, नायगाव, भोकर, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट या विधानसभेचा तर लातूर लोकसभा मतदारसंघात लोहा - कंधार विधानसभेचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात एकूण ४० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यासाठी ९७ पथके स्थापन करण्यात आली आहे. ९५ भरारी पथके निर्माण करण्यात आली आहे. एकूण ५३ पथके तयार करण्यात आल्या आहेत. २७ हजार नवमतदार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने चार हजार जणांविरूद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात २६ लाख ९३ हजार ७१५ मतदार आहेत. निवडणुकीसाठी २५ हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली असून एका ईव्हीएम मशिनमध्ये १५ उमेदवारांची यादी असेल व एक नोटाचे बटन ठेवण्यात आले आहे. ४८ हजार मयत मतदार वगळण्यात आले असून मतदान करण्यासाठी १६ प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

८५ वर्षांवरील वयोवृद्धांना मतदानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. यासह संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोवस्त नियुक्त केला जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

नांदेड लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम

ता. २८ मार्च रोजी अधिसूचना जाहीर होणार असून ता. चार एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ता. पाच एप्रिल रोजी छाननी होणार असून ता. आठ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

ता. २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून ता. चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. यानंतर ता. सहा जूनला नांदेड लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छता, पाळणाघर, व्हीलचेअर यासह इत्तर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी प्रथमच मतदान केंद्रावर वेटिंग हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com