नांदेड : शेतकऱ्याला अन्य पिकाच्या तुलनेत “करडई” पिकाचे उत्पन्न लाभदायक

रामराव मोहिते
Wednesday, 2 December 2020

हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात व अवर्षण प्रतिकारक  असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा राहत असल्याने या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.

घोगरी (जिल्हा नांदेड) : शेतकऱ्याला अन्य पिकाच्या तुलनेत “करडई” पिकाचे उत्पन्न लाभदायक ठरत असूनही, योग्य वावच मिळत नसल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळे कोरडवाहू पिकालाही वरदान ठरणाऱ्या “करडई” या पिकाचे लाभ क्षेत्र कमी झाले आहे. कोरियाई पीक म्हणून हरभरा पिकाला अधिकचे महत्त्व आले आहे.

हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात व अवर्षण प्रतिकारक  असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा राहत असल्याने या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.

गेली दहा ते बारा वर्षांपूर्वी या भागात पाऊस मान बऱ्यापैकी होत असल्याने, खरीप हंगामातील उडीद, मुग, ज्वारी, हे पीक  घेतल्यानंतर रब्बी हंगामाच्या दृष्टीने “करडई” हे पीक महत्वपूर्ण मानले जात असे. यामुळे या लाभ क्षेत्रात “करडई” पिक पेर मोठ्या प्रमाणात होत असे.

एरवी कोरडवाहू पिकासाठी वरदान ठरणाऱ्या करडई या पिकाचे उत्पन्न बऱ्यापैकी होत असे. परंतु मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या करडई ला योग्य भाव मिळत नसल्याने कालांतराने या पिकाचा पेरा कमी होऊन कुठेतरी तुरळक ठिकाणी पेर झालेली आढळून येत आहे.

इतर पिकाच्या तुलनेत या पिकाला मनुष्यबळाची अडचण भासत नाही. कमी खर्चात मुबलक उत्पन्न व बाजारात मालाला चांगली मागणी मिळते. एवढे असूनही या “करडई” पिकाचा पेरा अल्प होण्यामागचे नेमके कारण काय? हे शोधणे गरजेचे आहे. याशिवाय “करडई” या पिकाला पर्यायी म्हणून या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी, हरभरा, गहू, या पिकाची पेरणी करताना आढळत आहेत. वातावरणाच्या सततच्या बदलामुळे, म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याची बळीराजाची ओरड आहे. यापेक्षा बिनखर्चिक “करडई” ही  शेती परवडणारी असल्याचे बोलले जात आहे.

हा भाग जंगलाने व्यापलेला असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव आहे. रब्बी हंगामातील बहुतांश पेरलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, या पिकाचे वन्य प्राण्यापासून मोठी नासाडी होऊनही याच पिकास अधिक पसंती का? हा प्रश्न महत्वपूर्ण आहे.

काही शेतकरी आजही रब्बी हंगामातील पेरलेल्या पिकाचे संरक्षण व्हावे व आपल्याला शुद्ध तेल खाण्यासाठी मिळाव म्हणून या पिकाच्या बाजूने करडई हे काटेरी पीक घेतले जाते. घरी खाण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो.

ग्रामीण भागात आजही करडईच्या तेलाला सर्वाधिक पसंती असून बाजारपेठेत करडीचे तेल चढ्या दराने विकत घ्यावी लागते. मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाणारी करडई बेभाव किमतीत घेतली जात असल्याने, करडई शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने, या पिकाला शेतकऱ्यांनी बगल दिल्याचे दिसून येत आहे. सरकारने याबाबतीत लक्ष दिल्यास व शेतकऱ्यास मदतीचा हात दिला असता तर करडईचे उत्पादन पुन्हा वाढण्यास वेळ लागणार नाही अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Yield of "safflower" crop is more beneficial to farmers than other crops nanded news