
Nanded : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
नांदेड : राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. १५) नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. शहरातील कलामंदिर येथून मोर्चाला सुरूवात झाली. वजिराबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा धडकला.
राज्यात जवळपास दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे आठ हजार तीनशे रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच हजार आठशे रुपये तर मदतनीस यांना दरमहा चार हजार दोनशे रुपये मानधन मिळते. कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण आणि लाभ तसेच वाढता महागाई भत्ता त्यांना मिळत नाही.
त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये नाराजी आहे. तसेच अनेक प्रलंबित मागण्या आहेत. या सर्व मागण्यांची राज्य शासनाने तत्काळ पूर्तता करावी, यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती कृती समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. या मोर्चात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चानंतर शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.