महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर होऊन प्रगती साधावी

बालाजी कोंडे
Saturday, 21 November 2020

बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेऊन अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून काम करण्याबाबत सक्त निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले. 

माहूर (नांदेड) : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर होवून प्रगती साधावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ईवळेश्वर(ता.माहूर) येथे शुक्रवारी (ता.२०) केले. महिला सक्षमीकरणावर त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन केले व महिलांनी बनविलेल्या मालास बाजारपेठ (ऑनलाईन मार्केट) मिळवून देण्यासाठी उमेद विभागास निर्देशही दिले.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.२०) माहूर पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे, बालविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता श्री पाठक, गटशिक्षणाधिकारी किशन फोले उपस्थित होते.

बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेऊन अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून काम करण्याबाबत सक्त निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिले. 

तसेच रुई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन तेथील प्रसुतीगृहाची पाहणी केली. आरोग्य उपकेंद्र रुई येथे इमारत सुंदर असून पाण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. ईवळेश्वर गावामध्ये भेट देऊन नळजोडणी, घरकुल, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली. मियावाकी वृक्ष लागवडीची पाहणी करून उन्हाळ्यात झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सुचना दिल्या.

ईवळेश्वर येथील उमेद अभियानाचा आढावा घेतला तसेच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर होऊन प्रगती साधावी, याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिला बचत गटाच्या उत्पादित मालास योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद विभागास मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी निर्देश दिले आहे. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांची मोठी उपस्थिती होती.

गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.भिसे, बालविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, वैद्यकिय अधिकारी डॉ.टारपे, डॉ.एन.बी.राठोड, डॉ.रोडगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ए.के.साळुंके यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur visited Ivleshwar Rui in Mahur taluka and inspected the primary health center and sub center