नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन 'राज्‍यस्‍तरीय' पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Prime Minister Housing Scheme

नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन 'राज्‍यस्‍तरीय' पुरस्‍कार

नांदेड : महाआवास अभियानांतर्गत २०२० - २०२१ या कालावधीत केंद्र पुरस्कृत पंतप्रधान घरकुल योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेडच्या जिल्‍हा परिषदेस तीन पुरस्कार मिळाले आहेत. ग्राम विकास मंत्रालयाने शुक्रवारी या पुरस्‍काराची घोषणा केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक तथा अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांना पुरस्‍कार स्विकारण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले आहे. २०२० - २१ या कालावधीत केंद्र पुरस्कृत पंतप्रधान घरकुल योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्‍यासाठी राज्‍यात महाआवास अभियान राबविण्‍यात आले होते. या अभियानात सीईओ ठाकूर यांनी तालुकास्‍तरावर बैठका घेऊन तसेच प्रत्‍यक्ष गावस्‍तरावर कामांची पाहणी करुन घरकुल पूर्ण करण्‍यासाठी पाठपुरावा केला.

या अभियान कालावधीत घरकुलांच्‍या उद्दिष्‍टांप्रमाणे मंजुरी देणे, या उपक्रमात जिल्‍हा परिषदेला व्दितीय क्रमांक मिळाला आहे. मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती उपक्रमात तृतीय तर लाभार्थ्‍यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्‍थांचे कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्‍हा परिषदेला व्दितीय पुरस्‍कार मिळाला आहे. आवास योजनेतील जिल्‍हा परिषदेला तीन पुरस्‍कार घोषित करण्‍यात आले आहेत.

जिल्‍ह्याचे पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत लाभार्थ्‍यांना घरकुलांच्‍या चाव्‍यांचे वितरण करण्‍यात आले होते. घरकुल कामात जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींचा सहभाग व सहकार्याने आवास योजनेत उत्‍कृष्‍ट कामगिरी केल्‍यामुळेच जिल्‍हा परिषदेला राज्‍यस्‍तरीय तीन पुरस्‍कार मिळू शकले, अशी प्रतिक्रिया सीईओ ठाकूर-घुगे यांनी दिली.

जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. ता. २० नोव्‍हेंबर २०२० ते ता. पाच जून २०२१ या कालावधीत जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातून पंतप्रधान घरकुल योजनेतंर्गत २१ हजार ५९४, रमाई आवास योजनेत सहा हजार ३४, शबरी आवास योजनेत ७१०, पारधी आवास योजनेत ४५ तर आदिम कोलाम आवास योजनेत ६२ असे एकूण २८ हजार ४४२ घरकुलांचे बांधण्‍यात करण्‍यात आले आहे.

Web Title: Nanded Zilla Parishad Three State Level Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top