esakal | ‘ती’च्या येण्या जाण्याने नांदेडकरांच्या डोक्याला ताप
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दिवसातून कितीतरी वेळा वीज गुल होत असून, रात्रीही जातच असल्याने नांदेडकरांच्या अंगाची पार लाहीलाही होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिकांसोबतच बालकांच्या आरोग्यावरही होत आहे.

‘ती’च्या येण्या जाण्याने नांदेडकरांच्या डोक्याला ताप

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : सूर्याची उष्णता जशी वाढत चालली आहे, तसाच शहरात विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून अधूनमधून विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लाॅकडाउन केला आहे. त्यामुळे सर्वप्रकारची दुकाने, बाजारपेठा, उद्योग, व्यवसाय, शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे सर्वच कर्मचारी दिड महिन्यापासून घरातच बसून आहेत. परंतु,  उष्मा वाढत असल्याने विजेअभावी वातानुकूलित यंत्रे, कुलर घरात असूनही निरुपयोगी ठरत असल्याचे वास्तव आहे. दिवसातून कितीतरी वेळा वीज गुल होत असून, रात्रीही जातच असल्याने नांदेडकरांच्या अंगाची पार लाहीलाही होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिकांसोबतच बालकांच्या आरोग्यावरही होत आहे.

हेही वाचा - ‘यांच्या’ अखंडित सेवेमुळे आपण घरात सुखरूप आहोत, कोणामुळे? ते वाचलेच पाहिजे

नांदेडच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मराठवाड्यातील गंगाखेड, उदगीर येथे उष्माघातामुळे दोघांचा बळी गेला असून, त्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून सर्वांचा बचाव करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून विशेष कक्षही स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बालाजी शिंदे यांनी सांगितले आहे. 

खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात सुरु आहे. शेतकरी कोरोना संकटातही शेतावर राबत आहे. शहरी भागात लाॅकडाउनमुळे बाहेर निघणाऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरीही अत्यावश्यक बाबींसाठी घराबाहेर पडणारे अनेकजण आहेत. अशा नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून, सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

येथे क्लिक कराच - ऑनलाईन इंग्रजी प्रशिक्षणात ‘या’ केंद्राची बाजी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाला आहे. दररोज सायंकाळी व रात्री नऊ वाजेच्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यानच्या काळात वीजही गुल होत असल्याने नांदेडकरांना त्रास सहन करावा लागत आहे. दमट हवेमुळे मच्छरांशीही नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा ठिक आहे, पण किमान रात्रीतरी वीज जाणार नाही अशी व्यवस्था महावितरणने करावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

बालकांच्या आरोग्यावर परिणाम
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या बाहेर रणरणते ऊन असल्यामुळे नागरिक आपल्या मुलांना घराबाहेर काढत नाहीत. घरातच मुलांना पंखा, कुलरच्या हवेत ठेवले जाते. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातही बालकांना उष्णता सहन करावी लागते. त्यामुळे घामावाटे शरीरातील पाणी, खनिज पदार्थ बाहेर पडत असल्यामुळे डिहायड्रेशन, उन्हाळी, हगवण, ताप आदी आजारांच्या तावडीत बालके सापडत आहेत.
 
ही आहेत उष्माघाताची कारणे

  • थकवा येणे
  • ताप येणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • भूक न लागणे
  • चक्कर येणे
  • डोके दुखणे
  • पोटऱ्यात वेदना होणे
  • रक्तदाब वाढणे
  • मानसिक बेचैनी व अस्वस्थता