पावसाने उसंत दिल्याने गावरान सीताफळाला नैसर्गिक गोडवा !

रामराव मोहिते
Monday, 2 November 2020

गवतवाडी (ता. हदगाव ) या डोंगरदऱ्यातील वानाला जणू आठवडी बाजाराचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. परंतु ऐन मोसमातच अधिकचा पाऊस होण्याने वृक्ष फळाअभावी विरळ झाल्याने, “वरातीमागून घोडे” असे म्हणण्याची वेळ या भागातील वन मुजरावर आली आहे.

घोगरी (जिल्हा नांदेड) : पावसाने उसंत दिल्याने गावरान सीताफळाला नैसर्गिक गोडवा आला आहे. चांगली दर्जेदार फळे मिळावीत म्हणून, ग्राहक थेट शेतीच्या बांधावर जाऊन “ रानमेवा” खरेदी करत असल्याने, गवतवाडी (ता. हदगाव ) या डोंगरदऱ्यातील वानाला जणू आठवडी बाजाराचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. परंतु ऐन मोसमातच अधिकचा पाऊस होण्याने वृक्ष फळाअभावी विरळ झाल्याने, “वरातीमागून घोडे” असे म्हणण्याची वेळ या भागातील वन मुजरावर आली आहे.

सुरुवातीपासूनच या परिसरात चांगला पाऊस होण्याने, माळरानातील सीताफळाला चांगला बहर आलेला पाहून गरीब वनमजुर दार, भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी, सिताफळ सुगी चांगली येणार म्हणून आनंदला असतानाच, पुन्हा निसर्गाचा लहरीपणा आड आला. फळाचा बहर सुरु होण्याच्या ऐन मोसमातच, परिपक्व होण्याच्या वेळेलाच, परतीच्या पावसाची रिपरिप सुरू झाली. बरेच दिवस झड लागल्याने पक्व झालेली फळे झाडालाच पिकून, वाया जाऊ लागल्याने व सततच्या पावसामुळे सीताफळाच्या बनातील फळांना पाहिजे तसा उत्तम दर्जाचा आकार आलाच नसल्याने, या सीताफळाची मागणी मंदावली. यामुळे गायरान, बागायतदारांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने काही बागायतदारांनी, गायरान धारकांनी, घाई गडबडीमध्ये कवडीमोल भावात कच्ची फळे विकण्यास सुरुवात करून थोडीफार मिळकत पदरात पाडून घेतली.

हेही वाचा परभणीकरांनो सावध रहा...! कोरोना पुन्हा डोके वर काढतो

‘या’ जिल्ह्यात सीताफळाची मागणी

गेली पंधरा दिवसापासून पावसाने उसंत दिल्यामुळे, माळरानातील सीताफळाची गोडी, चव, देखणेपणा वाढल्याने या राणीच्या मेळाव्याला चांगली मागणी वाढल्याने, निजामबाद, आदिलाबाद, बोधन, निर्मल, भैसा, अमरावती, वनी, अकोला, नागपूर, उंबरखेड, पुसद आदी शहरातून व्यापाराची सीताफळे नेण्यासाठी गवतवाडी गावात एकच झुंबड उठली.

वनमजूर, भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी रोजगाराची संधी 

चांगली दर्जेदार फळे मिळावीत म्हणून ग्राहक थेट डोंगरदऱ्यातील शेतीच्या बांधावर जाऊन, रानमेवा खरेदी करताना दिसत असल्याने जणू या गावाला आठवडी बाजाराची स्वरूप आल्याचे पहावयास मिळतं आहे. वातावरणातील बदलाचा फटका व सततच्या झडीमुळे बहुतांशी वृक्ष फळाअभावी विरळ झाल्याने आता सीताफळाला वाजवी किंमत ( भाव ) येऊन काय उपयोग? बहुतांश सुगी ही संपल्यात जमा झाली आहे. आता वेळ निघून गेल्यावर, वरातीमागून घोडे  म्हणण्याची वेळ या भागातील सीताफळ बाग दारावर येऊन ठेपली आहे. याशिवाय उशिरा लागलेला बहर कुठेतरी तुरळक आढळत असल्याने कमीअधिक प्रमाणात का होईना, सीताफळ विक्रीतून या भागातील वनमजूर, भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी रोजगाराची संधी शोधताना दिसत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natural sweetness of Gavaran custard apple due to rains! nanded news