नवरात्रोत्सवाला सुरुवात, तरीही नांदेडच्या बाजारपेठेत शुकशुकाटच

प्रमोद चौधरी
Saturday, 17 October 2020

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अर्थकारण बदलले आहे. त्यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीच्या सणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापारी चिंतेत आहे.

नांदेड : नवरात्रोत्सवाला शनिवारी (१७ आॅक्टोबर २०२०) सुरुवात झाली असतानाही नांदेडमधील बाजारपेठेत शुकशुकाटच बघायला मिळत आहे. प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अर्थकारण बदलले आहे. त्यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीच्या सणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापारी चिंतेत आहे.

शनिवारी घटस्थापनने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यंदा कोरोनामुळे नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. जिल्हातील शक्तीपीठ असलेलेल माहूरगडची रेणुकादेवी, रत्नेश्वरी देवी मंदिरांत फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. शिवाय सार्वजनिक मंडळांनाही परवानगी मिळालेली नसल्याने शहरात ठिकठिकाणी शांतताच दिसत आहे. रविवारी (२५ आॅक्टोबर २०२०) दसरा सण साजरा होत आहे. या सणासाठी बाजारपेठेमध्ये नवीन कपडे खरेदीसाठी धूम असते. 

हेही वाचा - पहिल्याच दिवशी रेमडेसिव्हीर इंजेक्शनासाठी फिरवाफिरवी

मात्र, अद्यापही बाजारपेठेमध्ये शुकशुकाटच दिसून येत आहे. यंदा पीक चांगले बहरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे या आशेवरही पाणी फेरले आहे. शिवाय कोरोना महामारीने अनेकांच्या नोकऱ्या हिरवल्याने दसरा, दिवाळी सणांवर आर्थिक मंदीचे सावट दिसून येत आहे.  दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड, किराणा, ज्वेलरी, रंग, इलेक्ट्रॉनिक, रांगोळी, पणत्या, साबण, उटणे, तोरण, आकाशकंदील महिनाभरापासूनच बाजारात दाखल होतात. दिवाळीत तर शेतकरी, नोकरदारवर्ग इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर भर देतात. मात्र, यावेळी ही दुकानेसुद्धा ग्राहकांच्या प्रतिक्षेत असणार आहेत. 

हे वाचलेच पाहिजे - नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू
 
आॅनलाइन शॉपिंगला पसंती
कोरोनामुळे बहुतांश नागरिक खरेदीला घराबाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात आहे. सर्वाधिक प्रमाण मोबाईल खरेदीचे आहे. त्यासोबतच टी शर्ट, जीन्स, तयार कपडे, गॉगल, लॅपटॉप, एलसीडी-एलईडी, संगणक, महागड्या साड्या, अत्तर, सौंदर्यप्रसाधने आदींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लहान व्यावसायिक अक्षरशः जेरीस आल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

ग्राहकांचा खरेदीसाठी हात आखडता
काही दिवसांवर दसऱ्याचा सण आला असतानाही कपडे, दागिने खरेदी करण्यासाठी अद्यापही ग्राहक नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. कोरोनामुळे सतत वाढत जाणारी महागाई, व्यापार क्षेत्रात बदलत जाणाऱ्या सरकारी धोरणाचा फटका स्थानिक पातळीवरील व्यवसायिकांना बसत आहे. दसरा, दिवाळीनिमित्त दुकानदारांनी लाखो रुपये खर्च करून दुकाने सजविलेली असली तरी ग्राहक खरेदी करताना हात आखडता घेत आहेत.  

येथे क्लिक कराच - नांदेडला पावसामुळे तीन लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत
 
कपडा व्यवसाय थंडावला
कपडा व्यवसाय थंडावला आहे. दसरा सणातच अशी अवस्था असेल तर दिवाळी आणि इतर दिवसांत काय होईल, याची चिंता वाटते. शेतकऱ्यांसह नोगरदारांच्या हातात पैसा आल्याशिवाय कोणताच बाजार तेजित येणार नाही. कोरोनामुळे मार्चपासून मंदीचे वातावरण आहे. बाजारपेठेतील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. आॅनलाईन शॉपिंगमुळे आज महागडे मोबाईल विक्रीअभावी पडूनच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Navratri Festival Start But Market In Still Buzzing Nanded News