नांदेडच्या प्रा. यशपाल भिंगेंना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ऑफर 

शिवचरण वावळे
Friday, 30 October 2020

राष्ट्रदीच्या कोट्यातुन अनपेक्षित पणे प्रा. यशपाल भिंगे यांच्या  गळ्यात आमदारकिची माळ पडल्यास धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करणार आहेत. प्रा. यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीने बायोडाटा मागवून घेतल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

नांदेड - राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या १२ जागा निवडण्याच्या प्रस्तावावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विचार झाला आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोट्यातून वंचित बहुजन आघाडीकडून मागील लोकसभा निवडणूक पराभूत झालेले नांदेडचे प्रा. यशपाल भिंगे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. धनगर समाजाचा चेहरा म्हणून प्रा. भिंगे यांची ओळख आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बायोडाटा मागविला आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. 

राज्य मंडळाची गुरुवारी (ता. २९) बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रत्येकी चार आमदारांची नावे निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी कॉँग्रेस पक्षाकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना चार नावे निश्चित असलेला एक बंद लिफाफा मुख्यमंत्र्याकडे सोपविला असला तरी, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून अद्याप राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठीची नावे निश्‍चित झाली नाहीत. 

हेही वाचा- राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन- अशोक चव्हाण

धनगर समाजांचा एकच आमदार 

दोन्ही पक्षामध्ये नावाचा घोळ कायम असतानाच नांदेडमधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविलेले प्रा. यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीने बायोडाटा मागवून घेतल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. प्रत्येक पक्षाला धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे. धनगर समाजांची लोकसंख्या पाहता केवळ एकच आमदार निवडून आला आहे. त्यामुळे समाजामध्ये रोष आहे. काल परवापर्यंत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतू, आज धनगर समाजाचे अभ्यासू प्राध्यापक उभरते नेतृत्व म्हणून प्रा. यशपाल भिंगे यांच्याकडे बघितले जात आहे.

हेही वाचले पाहिजे- शंकरनगर येथील ‘त्या’ अत्याचार पिडीत मुलीस मिळाला हक्काचा निवारा

अभ्यासू चेहऱ्यास विधान परिषदेसाठी संधी मिळण्याची शक्यता

श्री. भिंगे राजकारणात नवखे असले तरी, त्यांचा समाजाविषयाचा दांडगा अभ्यास असून, इंग्रजी विषयाचा देखील त्यांना चांगला अभ्यास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून प्रा. भिंगे यांच्या रुपाने नवीन आणि अभ्यासू चेहऱ्यास विधान परिषदेसाठी संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

संधी मिळाल्यास चांगले काम करेल
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने माझ्याकडून बायोडाटा मागवून घेतला आहे. यात कुठलेही दुमत नाही. परंतू, विधानपरिषदेवर मला संधी मिळेल की नाही. याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. संधी मिळाल्यास  समाजासाठी चांगले काम करेल. 
- प्रा. यशपाल भिंगे, नांदेड. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's offer to Nanded's Pro. Yashpal Bhingen for the Legislative Council Nanded News