
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी (ता. दोन) आपले नामनिर्देशनपत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे दाखल केले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु ता. 27 फेब्रुवारी ते एक मार्च हे तीन दिवस सलग सुट्ट्यांचे दिवस आल्याने इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकले नाही. सलग सुट्ट्यांचा कालावधी संपताच मंगळवार (ता. दोन) मार्च रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी अर्जाचे सूचक साहेबराव काळे तर अनुमोदक दिनाजी सोनवळे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नामनिर्देशनपत्राचे सूचक प्रभाकर देशमुख हे असून अनुमोदक मारोतराव सोनाळे आहेत तर जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी अर्जाचे सूचक शंकराव नाईक हे असून या अर्जाला सुभाष देशमुख यांनी अनुमोदन दिले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची ता. पाच मार्च ही अंतिम तारीख आहे. ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेनंतर केवळ मंगळवार (ता. दोन) मार्च रोजी तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. पहिल्याच दिवशी दिनकर दहिफळे, राजेंद्र केशवे, विजय सोनवणे व राजेश पावडे यांनी उमेदवारी अर्जाची खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे स्पष्ट होत आहे.