पोलिसांचे दुर्लक्ष: शिवमंदीर ते कामगार पुतळा रस्ता बनला तळीरामांचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शिवमंदीर ते कामगार पुतळा (विमानतळ रोड) रस्ता हा मद्य रिचविणाऱ्यांसाठी जागोजागी अड्डा बनला आहे. मद्याच्या नशेत तर्रर्र झालेल्या तळीरामांचा ये- जा करणाऱ्या वाटसरुंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड : नांदेड शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा शिवमंदीर ते कामगार पुतळा (विमानतळ रोड) रस्ता हा मद्य रिचविणाऱ्यांसाठी जागोजागी अड्डा बनला आहे. मद्याच्या नशेत तर्रर्र झालेल्या तळीरामांचा ये- जा करणाऱ्या वाटसरुंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्यावर रेल्वेचे विभागीय कार्यालय आणि केंद्रीय विद्यालय असून कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. 

नांदेड शहरातील बीअर बार आणि काही हॉटेल्स लॉकडाउनमुळे बंद आहेत. मात्र बिअर शॉपी आणि देशीव विदेशी मद्य विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे मद्य मिळत आहे मात्र तळीरामांना विकत घेतलेले मद्य रिचविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बॉटल व चकना घेऊन थेट शिवमंदीर ते कामगार पुतळा रस्ता धरत आहेत. रस्त्याच्या कडेला अंधारात तर काही ठिकाणी उजागर बसुन मद्य रिचवत आहेत. मद्य घेतल्यानंतर रस्त्यावर बाटल्या तशाच सोडून निघून जात आहेत. तसेच काही जण रस्त्यावरुन जाणऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. यामुळे महिला वर्गाना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल

पोलिस चौकीचे काम अंतीम टप्प्यात

विमानतळ जाणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून अनेक महत्वाची व्यक्ती व विमानप्रवास करणारी मंडळी जात असते. तसेच सकाळी व सायंकाळचा फेरफटका मारण्यासाठी जेष्ठ नागरिक व महिला गर्दी करतात. रस्त्यावरुन फेरफटका मारणाऱ्याना रिकाम्या बाटल्यांचा सामना करावा लागतो. कामगार पुतळा परिसरात नव्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या पोलिस चौकीचे काम अंतीम टप्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी पोलिस जर राहिले तर नक्कीच तळीरामांची संख्या कमी होण्यास मदत होईल. 

मनुष्यबळ व वाहनसंख्या कमी

मात्र या अतिमहत्वाच्या रस्त्यावर पोलिसांची गस्त सतत फिरती राहिली तर नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना तळीरामांचा त्रास होणार नाही. या प्रकरणी विमानतळ पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून वाहनांची संख्या कमी आहे. तरीसुद्धा आमचे पोलिस दुचाकी व चारचाकी वाहनातून सतत गस्तवर असतात. रस्त्यावर जर असे तळीराम आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neglect of police: The road from Shiv Mandir to Kamgar Putla became Taliram's haunt nanded news