esakal | जूनी वीजबील थकबाकी असलेल्या ठिकाणी नवीन वीज जोडणी देता येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा तक्रार नामंजूरीचा आदेश

जूनी वीजबील थकबाकी असलेल्या ठिकाणी नवीन वीज जोडणी देता येणार नाही

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एखाद्या जागेवर पूर्वीची वीजजोडणी असेल व त्यावर वीज बिलाची थकबाकी असेल, तर अशा ठिकाणी महावितरणच्या नियमानुसार थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी देता येत नाही असे स्पष्ट करत तक्रार नामंजूर करण्यात येत असल्याचा आदेश नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका प्रकरणात नुकताच दिला आहे.

नांदेड शहरातील पिरबुऱ्हाण येथील सय्यद मुकस्सीर मीर सादर अली यांनी ता. 19 जून 2019 रोजी महावितरणच्या आनंदनगर शाखा कार्यालयाकडे नवीन सिंगल फेज वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ज्या जागेवर वीज जोडणी मिळावी असा अर्ज केला त्या ठिकाणी अब्दुल सत्तार शेख अहमद या नावाने ऑक्टोबर 2002 मध्येच वीज जोडणी देण्यात आलेली होती.

जूनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी देता येणार नाही

सदरील ग्राहकाकडे 87 हजार 330 रुपयांची थकबाकी असल्यामुळे सदरील ग्राहकाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. अर्जदार सय्यद मुकस्सीर सादर अली यांना कंपनीच्या नियमानुसार जूनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी देता येणार नाही असे महावितरणने वेळोवेळी सूचित केले होते. थकीत रक्कम भरणा करावी असेही सूचित करण्यात आले होते. तरीही सय्यद अली यांनी वीज जोडणी मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे ता. 16 ऑगस्ट 2019 रोजी अर्ज केला होता.

महावितरण कंपनीच्या नियमानुसार नवीन वीज जोडणी देता येणार नाही

आयोगाने अर्जदार व महावितरणचे दिलेले लेखी जबाब व म्हणणे विचारात घेऊन एखाद्या जागेवर पूर्वीचीच वीज जोडणी असेल व त्यावर वीज बिलाची थकबाकी असेल तर अशा जागेवर महावितरण कंपनीच्या नियमानुसार नवीन वीज जोडणी देता येणार नाही असे सांगत प्रस्तूत तक्रार नामंजूर करण्यात आल्याचा आदेश ता. 25 सप्टेंबर 2020 रोजी दिला आहे. 

नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या मार्गदर्शनानुसार

या प्रकरणात महावितरणच्या वतीने अॅड. दिपाली डोणगावकर यांनी बाजू मांडली. याप्रकरणी नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या मार्गदर्शनानुसार महावितरणचे विधी अधिकारी अॅड. इम्रान शेख यांनी सहकार्य केले.