रविवारी नांदेडला कोरोना बाधीत रुग्णांचा नवा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रविवारी (ता. दोन) तब्बल १७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

नांदेड : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात रोज नवे उच्चांक होत असून रविवारी (ता. दोन) तब्बल १७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. शनिवारी (ता. एक) प्रलंबित असलेल्या संशयितांचे ५७६ स्वॅब अहवाल रविवारी (ता. दोन) सायंकाळी प्राप्त झाले. यात ४०७ निगेटिव्ह तर १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात उपचार सुरु असलेल्या सात बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून रविवारी सापडलेल्या बाधीत रुग्णांची संख्या ही  आत्तापर्यंतची सर्वाधिक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याची ‘या’ संघटनेची मागणी ​

रुग्णांची संख्या दोन हजार १५६ वर

मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. आरटीपीसीआर व ॲन्टीजेन अशा दोन्ही पद्धतीच्या तपासणी सुरु आहेत. आज रविवारी १७० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात ॲन्टीजेन तपासणीद्वारे २३ तर आरटीपीसीआरद्वारे १४७ रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रुग्णांची संख्या दोन हजार १५६ एवढी झाली असून त्यातील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९५४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

हेही वाचा- नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण​

अशी आहे रविवारी तालुका निहाय रुग्णसंख्या

तालुकानिहाय रविवारी बाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड महापालिका - ४५, हदगाव - एक, हिमायतनगर - सात, धर्माबाद - तीन, देगलूर - नऊ, लोहा - सात, किनवट - पाच, कंधार - दोन, मुदखेड - एक,  मुखेड - ३५, नायगाव - ३९, बिलोली - दहा, अर्धापूर - दोन, देवणी (जि. लातूर) - एक, वसमत (जि. हिंगोली) - दोन, परभणी - एक.
रविवारी दिवसभरात १९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार १०१ रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील सात महिला व दहा पुरुष अशा एकूण १७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. 

कोरोना मीटर
- एकूण बाधित रुग्ण संख्या - दोन हजार १५६
- रविवारी बाधित रुग्ण संख्या - १७० 
- रविवारी झालेले मृत्यू - सात
- रविवारी सुटी झालेले रुग्ण - १९
- एकूण आत्तापर्यंतचे मृत्यू - ९०
- एकूण आत्तापर्यंतचे रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण - ९५४  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New High Of Corona-Infected Patients In Nanded on Sunday Nanded News