नांदेडात घुसलेले पंजाबचे नऊ कामगार क्वारंटाईन

प्रल्हाद कांबळे
Thursday, 30 April 2020

नांदेडात घुसलेल्या नऊ प्रवाशांना भाग्यनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास तरोडानाका परिसरातून ताब्यात घेतले.

नांदेड : शेजारील जिल्ह्यातून पंजाबच्या नागरिकांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास कधी वाहनांच्या साह्याने तर कधी पायी नांदेडात घुसलेल्या नऊ प्रवाशांना भाग्यनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास तरोडानाका परिसरातून ताब्यात घेतले. शासकिय रुग्णालयात त्यांची तपासणी करून त्यांना येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये सचखंड गुरूद्वाराचे दर्शन व हल्ला- मोहल्ला या कार्यक्रमासाठी आलेले जवळपास चार हजार भाविक लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेसाठी महाराष्‍ट्र व पंजाब सरकारने प्रयत्न केले. नुकतेच त्यांना पंजाबला नेऊन सोडले आहे. पंजाबच्या भाविकांना मोफत सोडण्यात येत असल्याची माहिती परभणी व जालना जिल्ह्याच्या सिमेवर कामासाठी आलेल्या पंजाबच्या नऊ जणांना चाहूल लागली. त्यानंतर त्यांनी नांदेडला पोहचण्याचा निर्णय घेतला. शेवटी ते पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने मंगळवारी पहाटे नांदेडमध्ये दाखल झाले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने ते पोलिसांच्या तावडीत सापडले. सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. 

हेही वाचाशिख बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन केला अंत्यसंस्कार

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

लॉकडाउनमुळे शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी असतानाही अशा बाहेरून येणाऱ्या लोकांना शहरात प्रवेश कसा मिळतो हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नांदेडमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना पंजाबकडे पाठवून चोवीस तास उलटले नाहीत तोच पंजाब राज्यातील सुमारे नऊ प्रवासी नांदेडमध्ये दाखल झाले. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भाग्यनगर पोलिस स्टेशन ते राज कॉर्नर रस्त्यावर काहीजण पाठीवर सामानाचे गाठोडे घेऊन जात असल्याचे दिसले. 

डीवायएसपी अभिजीत फस्के यांची सतर्कता

तेव्हा स्थानिक प्रवाशांनी त्यांना विचारणा केली त्या प्रवाशाने आपण पंजाब राज्यातील असून आम्ही शेजारील जिल्ह्यात कामाला होतो. यावेळी नागरिकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजित फस्के यांना ही माहिती दिली. दरम्यान भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिमन्यु काळे, पोलीस उपनिरीक्षक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रवाशांची चौकशी करून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर यांना वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. 

येथे क्लिक कराVideo - ‘या’ कारणासाठी हवी वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ...

नांदेडात येण्यापूर्वीच बस पंजाबकडे रवाना

विशेष म्हणजे नांदेडमध्ये दाखल झालेले प्रवासी बाजूच्या जिल्ह्यातील कामगार होते. नांदेडमधून पंजाबकडे जाण्यासाठी विशेष बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली म्हणून त्या लोकांनी नांदेड गाठण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरोडा नाका परिसरातील जागरूक नागरिकांमुळे नांदेडमध्ये घुसण्याचा प्रयत्न फसला. तसेच नांदेडमधील अडकलेले भाविक पंजाबकडे दोन दिवसापूर्वीच रवाना झाले होते. त्यामुळेही त्या लोकांची निराशा झाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Punjab workers quarantined after entering Nanded