Video : ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही, असे कोण म्हणाले ते वाचाच

प्रमोद चौधरी
Friday, 1 May 2020

दररोजची सकाळ ही नवीन युद्धानेच होते आहे. खरे म्हणजे, ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची किंवा राजकारण करण्याची नाही, असे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 
 

नांदेड : सद्यस्थितीत नांदेडची परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रश्‍न आहे, कोणी बाहेरगावहून येत आहे. तर काही यात्रेकरू बाहेर जात आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे होत आहे ते सांगता येत नाही. कोरोनाचा लढा हा मोठा आहे. दररोजची सकाळ ही नवीन युद्धानेच होते आहे. खरे म्हणजे, ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची किंवा राजकारण करण्याची नाही, असे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

महाराष्‍ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजवंदनप्रसंगी ते शुक्रवारी (ता. एक मे २०२०) बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निराशाचं सावट आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व जनता निराशेच्या छायेत आहेत. मात्र, घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या, निश्‍चितच आपण कोरोनावर मात करू.  संपूर्ण जगातच कोरोना विषाणुच्या महामारीमुळे दररोजची सकाळ ही नवीन युद्धाने होत असून ती परिस्थिती नांदेडमध्येही आहे. त्यामुळे दररोज सकाळी आढावा घेवून त्यावर निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, संयम बाळगावा, असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले.

हेही वाचा - धक्कादायक :  नांदेडमध्ये बाधीतांची संख्या गेली सहावर,  दोघांचा मृत्यू
 
दरम्यान मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजवंदन झाले. यावेळी  पोलीस दलातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. यामध्ये पोलिस निरीक्ष्षक प्रशांत अनंतराव पवार, सहपोलिस उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक शिवदास देशमुख, माधव मोहनराव पल्लेवाड, दहशतवादी विरोधी पथकातील बालाजी गणपतराव सोनटक्के, शामसुंदर यादवराव छात्रकर, सूर्यकांत व्यंकटराव घुगे, पोलिस मुख्यालयातील मारुती रामराव केसगिर यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
ध्वजवंदनप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नांदेड परिक्षेत्र) मनोज लोहिया,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त  डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) शरद कुलकर्णी,  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Is Not The Time For Impeachment Nanded News