परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना मिळाला कॉँग्रेसतर्फे आधार...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

नांदेड जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) कोरोनाशी रात्रंदिवस लढणाऱ्या परिचारिका, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

नांदेड - काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) कोरोनाशी रात्रंदिवस लढणाऱ्या परिचारिका, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, काँग्रेस विधान परिषदेतील प्रतोद महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समिती माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती अनुजा तेहरा, महिला व बाल कल्याण सभापती प्रकाशकौर खालसा, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांमधला डॉक्टर जागा होतो तेव्हा...

सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न
आमदार श्री. राजूरकर म्हणाले की, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि नर्सेस ह्या जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. आपण या योद्ध्यांचा आदर केला पाहिजे. काँग्रेसच्या वतीने अन्नधान्याचे किट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. माजी पालकमंत्री श्री. सावंत म्हणाले की, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे आशा वर्कर यांना तीन हजार रुपये वाढीव मानधन देण्यासाठी आग्रही आहेत. ते लवकरच होईल. यावेळी मंगाराणी अंबुलगेकर, माजी सभापती अनुजा तेहरा, डॉ. रेखा चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. 

हेही वाचलेच पाहिजे - सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी......कुठे ते वाचा -

मान्यवरांच्या हस्ते गौरव
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मान्यवरांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश बिसेन, आरोग्य कर्मचारी जी.एस.पाटील, सुरेश आरगुलवार, नर्स राधा वडजे, वैशाली पांचाळ, ज्योती सुरनर, गंगाबाई सुरणे, आशा वर्कर लता कांबळे, शांता अंबुलगेकर, शालिनी विनकरे आणि वंदना पोहरे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करून त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सीमेवर चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurses, Asha Workers, Anganwadi Workers Get Support from Congress ..., Nanded News