नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून दिड लाखाने गंडविले, दोघांविरुध्द गुन्हा 

प्रल्हाद कांबळे
Monday, 3 August 2020

नोकरीची चौकशी करण्यास गेले असता तु माझ्या घरी येवू नकोस असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मनिषा सोनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नांदेड : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण, तरुणींना एक लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी  एका महिलेसह दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हदगाव तालुक्यातील गायतोंड येथील रहिवासी असलेली तरुणी मनिषा अशोक सोनाळे ही सध्या नांदेड शहरातील प्रकाशनगरात राहते. दरम्यान गोकुळनगर येथील रहिवासी व्यंकट मुदिराज यांच्या ओळखीने मनिषासह तिचा भाऊ व मैत्रिणीला नोकरी लावतो असे आमिष दाखवून नगदी एक लाख ५० हजार रुपये घेतले. भावाच्या नावाने मनिषाच्या वडीलाच्या खात्यातून एटीएमद्वारे आरोपी महिला शिवकांता सदाशिव कदम रा. विष्णुनगर हिच्या खात्यावर ऑनलाईन रक्कम जमा केली. यामध्ये आरोपीनी संबंधीताची एक लाख ५० हजार रुपयाने फसवणुक केली. त्यामुळे नोकरीची चौकशी करण्यास गेले असता तु माझ्या घरी येवू नकोस असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मनिषा सोनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. लष्करे करत आहेत.

हेही वाचा -  रक्षाबंधनदिन विशेष : बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौघांची आत्महत्या 

विविध कारणावरुन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची   नोंद करण्यात आली.

मध्यप्रदेशातील वाकड येथील मेंढीपालन करणारा सुरेश किशन रजपूत (वय १९) हा ता. एक ऑगस्ट रोजी दुपारी भोकर तालुक्यातील आमदरी जंगलात मेंढ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याने जंगलातील एका झाडाला रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली.  

विविध पोलिस ठाण्यात नोंदी

दुसरी घटना भोकर तालुक्यातील डोरली (साळवाडी) येथे ता. ३० जुलै रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. यामध्ये मारोती नारायण खरोडे (वय   ५०) या व्यक्तीने विषारी औषध प्राशन केले. त्यास पुढील उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या तिसऱ्या घटनेत माहूर तालुक्यातील वानोळा येथील अंकुश शेषराव पवार (वय २७) या शेतमजूराने एकऑगस्ट रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. तसेच माहूर तालुक्यातील लांजी येथील अंबादास तुळशीराम राठोड (वय ४५) या इसमाने ता. ३१ जुलै रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधीत पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half lakh wasted by showinga job a crime against both of them nanded news