
नांदेड : एक लाखाची खंडणी घेणाऱ्यास अटक
नांदेड : बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास एक लाखाची खंडणी मागून ती स्विकारताना माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) विलास पुंडलीक घोरबांड (वय ३३, रा. कलंबर, ता. लोहा) यास मंगळवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या दरम्यान लातूर फाटा डॉ. आंबेडकर चौक येथे पोलिसांनी अटक केली.
पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तयार करून सापळा रचण्यात आला होता. याबाबत बांधकाम साहित्याचे विक्री करणारे व्यापारी विकास मोहनराव आढाव (वय ३६, रा. विकासनगर, कौठा) यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. घोरबांड याने आढाव यांच्या विरोधात तहसील कार्यालयात बेकायदेशीर मुरूम उत्खनन करून विक्री करत असल्याची तक्रार दाखल केली होती. सदरील तक्रार मागे घेण्यासाठी मागील चार पाच महिन्यांपासून घोरबांड एक लाख रुपयांची मागणी करत होता.
हेही वाचा: अकाेला : बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करा
मी माहिती अधिकाराचा कार्यकर्ता असून भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीचा अध्यक्ष आहे, असे सांगून घोरबांड जास्तच त्रास देत होता. त्यामुळे नाईलाजाने एक लाख रुपये खंडणी देण्याचे मान्य केले. पैसे जवळ नसल्यामुळे पैशाची तडजोड करून पहिला हफ्ता म्हणून ५० हजार देण्याचे ठरले व एक ते दीड महिन्याने ५० हजार देण्याचे ठरले. मात्र, आढाव यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार घोरबांड याला पैसे घेताना पथकाने पकडले असून त्याच्याविरूद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, मनाठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस जमादार दत्ता जाधव, पोलिस नायक गांगुलवार, पोलिस शिपाई कदम, विलास राठोड यांनी ही कारवाई केली.
Web Title: One Lakh Extortion Was Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..