जिल्ह्यातील २० टक्केच व्यापाऱ्यांकडे होलमार्क परवाना, मराठवाड्यात २०, २२ कॅरेटच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी

शिवचरण वावळे
Saturday, 24 October 2020

सोन्याच्या दागिन्यावर १४, १८ व २२ कॅरेट सोन्यावर त्याचे मूल्य ठरविले जाते. १४ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यामध्ये ५८ टक्के शुद्ध सोने, १८ कॅरेटमध्ये ७५ टक्के शुद्धता आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यात ९१ टक्के शुद्ध सोने असल्याचे सांगण्यात येते

नांदेड - सोन्याची शुद्धता तपासणीसाठी असणाऱ्या भारतीय नामक ब्युरो हा होलमार्क सोन्याच्या दागिन्यावर असावा लागतो. यावरून सोन्याची शुद्धता ठरवली जाते. मात्र जिल्ह्यातील सोने - चांदीच्या ठराविक व्यापारी, दुकानदारांकडे होलमार्क परवाना असल्याचे सराफा असोसिएशन संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने माहिती दिली. त्यामुळे एका दुकानदाराकडून घडविलेले सोन्याचे दागिने दुसऱ्या दुकानावर मोड करण्यासाठी गेलात तर त्या सोन्याच्या दागिन्याच्या वजनात अंशतः घट करून पैसे दिले जातात.

सोन्याच्या दागिन्यावर १४, १८ व २२ कॅरेट सोन्यावर त्याचे मूल्य ठरविले जाते. १४ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यामध्ये ५८ टक्के शुद्ध सोने, १८ कॅरेटमध्ये ७५ टक्के शुद्धता आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यात ९१ टक्के शुद्ध सोने असल्याचे सांगण्यात येते. २३ व २४ कॅरेटच्या सोन्याचे दागिने शुद्ध समजले जातात. असे असले तरी मराठवाड्यात २० आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी आहे.

हेही वाचा- नांदेडमध्ये वाळूची तस्करी करणारा टिप्पर उलटला, दहा जण गंभीर जखमी

शुद्ध सोने म्हणजे काय?

जे दागिने शुद्ध असतात त्या सर्व दागिन्यांवर २२ कॅरेटचा शिक्का, सेंटरचा होलमार्क, शिक्का आणि ज्या दुकानात दागिना घडविण्यात आला त्या दुकानदाराकडून दागिन्यांवर शिक्का मारला जातो. त्यामुळे त्या सोन्याची विश्‍वासाहर्ता अधिक असते; परंतु शहरातील अनेक सोने, चांदीच्या दुकानदारांकडे ‘भारतीय नामक ब्युरो’चा होलमार्क नसतो. त्यामुळे ग्राहकांनी केलेले दागिने दुसऱ्या दुकानात त्याची मोड करताना दागिन्यात घट गृहीत धरली जाते.

हेही वाचले पाहिजे- नांदेड : अनाथ गंगासागरच्याा जिद्दीचा प्रवास; प्रशासकीय सेवेचं स्वप्न

बाजारात ग्राहकांची वानवा

महाराष्ट्र राज्य सराफा सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने २०, २३ आणि २४ कॅरेटच्या दागिन्यांवर होलमार्किंग करण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास ग्राहकांना शुद्ध सोने मिळेल. एकदा घडविलेला दागिना इतर कुठेही त्याची सहजपणे मोड करता येईल. यात घट होणार नसल्याचे सांगितले. दसऱ्याचा मुहूर्त आला असताना देखील कोरोनाच्या भीतीने आणि लॉकडाउनमध्ये अनेकांना नोकरी, व्यवसायावर पाणी सोडावे लागल्याने बाजारात ग्राहकांची वानवा आहे.

होलमार्क ही किचकट प्रक्रिया
जुलै २०२१ पासून सर्वच सुवर्णकारांना सोन्याच्या दागिन्यावर होलमार्क असणे आवश्‍यक करण्यात येणार आहे; परंतु होलमार्कही फार किचकट प्रक्रिया असल्यामुळे या विरोधात महाराष्ट्र राज्य सराफा सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने न्यायालयात धाव घेत वरील अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
- सुधाकर टाक धानोरकर, संघटनेचे राज्यसचिव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 20% of traders in the district have hallmark licenses 20-22 carat jewelery is most demanded in Marathwada Nanded News