अतिवृष्टीग्रस्त शेतीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण

सुनिल पौळकर
Monday, 26 October 2020


मुखेडात दीड-दोन महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात अनेक शेतकऱ्यांच्या हातचे पीक निसर्गाने हिरावून घेतले. यानंतर राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील शेतीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, यात ७७ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर पिक घेण्यात आले होते. यात ६७ हजार ७८८ शेतकऱ्यांचे ४८ हजार ७९५ हेक्टर जमिनीला या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. आता पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बळीराजाला केवळ मदतीची आस लागून राहिली आहे. 
 

मुखेड, (जि. नांदेड) ः मुखेडात दीड-दोन महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात अनेक शेतकऱ्यांच्या हातचे पीक निसर्गाने हिरावून घेतले. यानंतर राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील शेतीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, यात ७७ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर पिक घेण्यात आले होते. यात ६७ हजार ७८८ शेतकऱ्यांचे ४८ हजार ७९५ हेक्टर जमिनीला या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. आता पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बळीराजाला केवळ मदतीची आस लागून राहिली आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आता शेतकऱ्यांना सरसकट शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. 

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले नाही
तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने या भागातील शेतकरी केवळ खरीप हंगामावर अवलंबून असतो. काही अंशी शेतकरी स्वतःच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बीचे पीक घेतात. मुळात या भागातील पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न न केल्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले नाही. या भागातील एकमेव लेंडी प्रकल्प अजूनही पुनर्वसन व मावेजाच्या कचाट्यात अडकलेला आहे. 

हेही वाचा -  नांदेड महापालिकेच्या आॅनलाइन सभेत ३५ विषयांना मंजुरी
 

 

दौरा करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश 
तालुक्यातील अनेक महसूल मंडळात सरासरीपेक्षा दोनशे ते तीनशे मिमी जादा पावसाची नोंद झाली. तर काही महसूली मंडळात दोन ते तीन वेळेस अतिवृष्टीची नोंद झाली. मुक्रमाबाद महसुली मंडळात १६०० मिमी पेक्षाही जास्त पाऊस झाला. हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल दुप्पट आहे. परिणामी या मंडळातील दोन पाझर तलाव फुटले व पिकासह जमिनी खरडून गेल्या. या वेळी जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी या भागाचा दौरा करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तालुक्यातील ७७ हजार ८६४ हेक्टर जमिनीवर पीक घेण्यात आले होते. त्यातील ६७ हजार ७८८ बाधित शेतकऱ्यांच्या ४८ हजार ७९५ हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात जिरायत पिकाखालील सर्वाधिक सोयाबीन ३९४०९ हेक्टर, कापूस ३१६९ हेक्टर, तूर ३१६८ हेक्टर, ज्वारी २४९४ हेक्टर तर इतर पीक २७१ हेक्टर असल्याचे अहवालात दिसून येत आहे. 

२४ हजार रुपये प्रती हेक्‍टर मदत करावी
सप्टेंबर महिन्यात बरसलेल्या परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. त्याबाबत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र नुकताच बरसलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून आता पंचनाम्याचा विचार न करता राज्य शासनाने सरसगट २४ हजार रुपये प्रती हेक्‍टर मदत करावी. असे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले, तसेच राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे थेट बांधावर जाऊन कर्मचाऱ्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली असून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असल्याचे काशिनाथ पाटील, तहसीलदार, मुखेड यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchnama Of Over-Flooded Agriculture Has Been Completed, Nanded News