परभणी- हैद्राबाद रेल्वे सुरु मात्र हायकोर्ट कधी सुरु होणार? प्रवाशांतून मागणी

प्रल्हाद कांबळे
Monday, 14 September 2020

दीर्घ कालावधीनंतर नांदेड ते हैदराबाद दरम्यान विशेष प्रवासी रेल्वे प्रथमच सचखंड एक्सप्रेसनंतर धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वेचे मराठवाड्यातील प्रवाशांनी जागोजागी जल्लोषात स्वागत केले.

नांदेड : कोरोनाच्या काळात मागील पाच महिन्यापासून बंद असलेल्या रेल्वे हळूहळू पटरीवर येत आहेत. नांदेडहून आता सचखंडनंतर हैद्राबाद रेल्वे धावू लागली आहे. दीर्घ कालावधीनंतर नांदेड ते हैदराबाद दरम्यान विशेष प्रवासी रेल्वे प्रथमच सचखंड एक्सप्रेसनंतर धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वेचे मराठवाड्यातील प्रवाशांनी जागोजागी जल्लोषात स्वागत केले. मात्र धर्माबाद ते मनमाड (हायकोर्ट एक्सप्रेस) कधी सुरु करणार असा सवाल मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांनी उपस्थित केला आहे. 

मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी सचखंड एक्सप्रेसनंतर हैदराबाद- परभणी- हैदराबाद ही विशेष रेल्वेगाडी शनिवार (ता. १२) रात्रीपासून दररोज सुरू करण्यात आली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता परभणी रेल्वे स्थानकाहून सुटलेल्या या रेल्वे गाडीला प्रवाशांनी उत्साहात निरोप दिला. ही रेल्वेगाडी परभणी- पूर्णा- नांदेड- मुदखेड- निजामबाद- कामारेडी- सिकंदराबाद आणि हैदराबाद अशा प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. परभणी व नांदेडहुन रात्री उशिरा हैदराबादसाठी निघून परतीचा प्रवासदेखील रात्री उशिरा निघून सकाळी पोहोचणारी ही रेल्वेगाडी असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या रेल्वेगाडीला दोन मालवाहू डबे, सात जनरल सेकंड सेटिंग, चार स्लीपर, थ्री टायर एसी असे पंधरा डबे आहेत. 

हेही वाचा - Video- परभणी : आमदारांच्या घरासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

प्रवाशांना पूर्व आरक्षणाशिवाय रेल्वे प्रवेश नाही

कोरोना संक्रमित प्रवासी असल्यास त्याला प्रवास करता येणार नाहीत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर जाताना व येताना प्रवाशांची थर्मल गन आणि ऑक्सी मीटरने तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांनी आपल्या सोबत सॅनीटायझर बाळगणे चेहऱ्यावर मुखपट्टी लावणे बंधनकारक आहे.

रॉयलसीमा नांदेडहुन कधी सोडणार ?

निजामबाद- तिरुपती- निजामबाद रॉयलसीमा सुपरफास्ट एक्सप्रेस निजामबादऐवजी नांदेडहुन सोडण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शविला. मात्र ती गाडी अद्याप नांदेडहून सोडण्यात आली नाही. नांदेडहुन गाडी सुरू करण्याची मागणी मराठवाड्यातील तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांमधून केली जात आहे. ही रेल्वेगाडी सध्या निजामबाद दररोज तिरुपतीकडे धावते. नांदेडहुन सोडण्यासाठी राजकीय पातळीवर फारसे प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येते.

येथे क्लिक करा नांदेड : सुशिक्षित बेरोजगार नवउद्योजकांचे व्याजासह कर्ज माफ करावे

धर्माबाद- मनमाड- धर्माबाद सुरु करा

मराठवाडा एक्सप्रेस ही मराठावाड्यातील रेल्वेप्रवाशांची मुख्य गाडी समजल्या जाते. या गाडीने दररोज हजारो प्रवाशी उच्चन्यायालय औरंगाबाद, जालना आणि परभणी तसेच धर्माबाद परिसरातील प्रवाशी नांदेडसाठी दररोज ये- जा करतात. त्यात विशेष म्हणजे चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मराठवाडा एक्सप्रेस हायकोर्ट ही गाडी सोयीची असल्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने यासाठी पाठपुरावा करुन ही गाडी सुरू करावी अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani-Hyderabad railway starts but when will the High Court start? Demand from passengers nanded news