
माहूर तालुक्यातील आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे एका रुग्णाला उपचाराअभावी ताटकळत राहावे लागले.
वाई बाजार (नांदेड) : माहूर तालुक्यातील आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे एका रुग्णाला उपचाराअभावी ताटकळत राहावे लागले. याचे प्रत्यय शुक्रवारी (ता.२६) रोजी आले. प्रचंड उकाड्यात पत्नी समवेत आलेले रुग्ण वेदनेने विव्हळत असताना सायंकाळी चार वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव हे आरोग्य केंद्रात आल्यानंतर सदर रुग्णाला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दाखल करण्यात आले.
ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्था नसल्यास रुग्णांना उपचाराविना तडपडावे लागत आहे. माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी कर्तव्यात कसूर असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. आष्टा येथील सुमित भगत वय अंदाजे (३५) हा रुग्ण मागील चार ते पाच दिवसांपासून रक्त पेश्या कमी झाल्याने माहूर येथे उपचार घेत होता. त्यामध्ये सकाळ संध्याकाळ इंजेक्शन घ्यायचे होते.
शनिवारी (ता.२७) रोजी चार वाजता रुग्ण इंजेक्शन टोचून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आला असता तीन डॉक्टरापैकी दवाखान्यात एकही उपलब्ध नव्हते. अधिक चौकशी केली असता गैरहजर असणारे डॉ. गणेश जाधव हे कोरोना बाधित झाल्याने उपचार घेत आहेत. दुसरे डॉ. संदेश जाधव रुग्ण सेवा आटोपून जवळच असलेल्या आपल्या वानोळा गावी गेल्याचे समजले तर कार्यरत डॉ.प्रकाश जाधव हे आपल्या निवासस्थानी हजर होते. सुमित भगतत्याचे रक्त पेशी झपाट्याने कमी झाल्याने प्रचंड अशक्तपणा आला होता. तो दवाखान्याच्या दारावरच उन्हामध्ये वेदनेने विव्हळत होता. रुग्णाच्या पत्नी डॉ.जाधव यांच्या निवासस्थानी खेटे घातले. परंतु डॉ.साहेब यांच्या पत्नीने डॉक्टर झोपलेले आहेत ते आत्ताच कर्तव्यावरून दमून आलेत, असे बोलून टाळून दिले.
यानंतर दवाखान्यातील रुग्ण व नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अवगत केले. परंतु तेवढे समाधान जाधव यांचे देखील फोन घेण्यास कोणीही तत्पर होता हे पाहून जाधव काही वेळातच दवाखान्यात पोहोचले आणि निवासावर उपस्थित डॉ.प्रकाश जाधव यांची कानउघडणी करून रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून रुग्णाला ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. उपचाराअभावी आणखी थोडावेळ हा रुग्ण पडून राहिला असता तर घडणाऱ्या प्रकाराची जबाबदारी मात्र कोणीच घेतली नसती.
ग्रामीण भागातील लोकांना कमी दरात या रुग्णालयात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी खर्च करते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. आष्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण आहेत, तर वैद्यकीय अधिकारी नाहीत. खेड्यापाड्यांतून ज्यावेळी रुग्ण या रुग्णालयात येतात. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णांलयाचा आधार घ्यावा लागतो.
जे की आर्थिक दृष्ट्या त्यांना परवडणारे नाही. मागील महिन्यात जिल्हा परिषद सदस्यांनी दवाखान्याला भेट देऊन भेट पुस्तिकेत वैद्यकीय अधिकारी सातत्याने गैरहजर असल्याचा शेरा दिला होता. परंतु त्यावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई केली नसल्याने आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा सध्या वार्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आष्टा आरोग्य केंद्रात कार्यरत तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ.गणेश जाधव उपचार घेत आहेत. डॉ.संदेश जाधव सेवा देऊन नुकतेच त्यांनी जवळच असलेल्या त्यांच्या वानोळा येथील गावी गेले होते. तर डॉ.प्रकाश जाधव हे कर्तव्यावर हजर होते. अष्ट आरोग्य केंद्रात डॉ.गणेश जाधव यांच्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी सूचना केल्याप्रमाणे दोन वेळेस अहवाल पाठवण्यात आले आहे. घडलेल्या घटनेचे देखील अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. नागरिकांनीही त्यांना समजून घ्यावे.
- डॉ.एस.बी.भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूर.आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी असून मी व्यक्तिश: दवाखान्यात पोहोचेपर्यंत डॉक्टर निवासस्थानी असून देखील उपचार करण्यास उपलब्ध झाले नाही. आरोग्य सेविकांनी उपचार केला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविड केंद्रात सेवा देत असल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यावर जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार रुग्णसेवेचा मुद्दा उपस्थित करणार.
- समाधान जाधव, जिल्हा परिषद सदस्य, वाई बाजार.