
मोक्का अंतर्गत कारागृहात असणाऱ्या पोलिस निरीक्षकासह एका काँग्रेस कार्यकर्त्याचा जामीनअर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.
नांदेड : शहरातील चौफाळा परिसरात राहणारे व्यावसायीक तथा पद्मशाली समाजाचे प्रतिष्ठीत गोविंद कोकुलवार यांच्यावर खंडणीसाठी झालेला जीवघेणा हल्ला प्रकरणात व पुढे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) जोडला गेला. यातील तुरुंगात असलेले मंगरुळपीर (जिल्हा वाशिम) निलंबित पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे आणि काॅंग्रेसचे वीरेंद्र कानोजी उर्फ भंडारी याच्यासह सहा जणांनी जामिन मिळावा म्हणून विनंती अर्ज केला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन बुधवारी (ता. १७) नाकारला आहे.
ता. १७ सप्टेंबर रोजी २०१९ रोजी चौफळा भागात काँग्रेस कार्यकर्ते तथा सध्याचे काँग्रेस नगरसेवक नागेश कोकुलवार यांचे वडील गोविंद कोकुलवार यांच्यावर बंदूकीतून गोळीबार झाला. या घटनेत त्यांना जवळपास अपंगत्व आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक 176/ 2019 मध्ये सर्वप्रथम शेख गुड्डू रा. पिरबुऱ्हाननगरमधील नावाचा आरोपी पकडला. त्यानंतर योद्धा नरवाडे, राजू राऊत, श्री. पवार, लकी उर्फ गुरुचरणसिंग असे पाच आरोपी पकडले.
अगोदर या सर्वांवर जीवघेणा हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची व्याप्ती नांदेड पोलिससांह पंजाब पोलिसांना पाहिजे असलेला कुख्यात रिंदा उर्फ हरविंदरसिंग संधू यांच्या सोबत जोडली गेली होती. त्यामुळे हळूहळू हा गुन्हा निलंबित पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे याच्यापर्यंत पोहोचला. सोबतच काँग्रेसमध्ये वजन असलेला कार्यकर्ता विरु उर्फ वीरेंद्र कानोजी उर्फ भंडारी याचे नाव आले. त्याच्यावर इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डिसेंबर 2019 मध्ये वीरु भंडारीला अटक झाली. त्यानतंर त्याच्या मोबाईल रेकाॅर्ड व भंडारी याच्या जबाबावरुन विनोद दिघोरे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुढे आले. आणि जानेवारी 2019 मध्ये विनोद दिघोरे यांना अटक झाली.
विनोद दिघोरे हे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते. आपल्या अटकेनंतर विनोद दिघोरे यांनी गुण्याच्या संदर्भाने भरपूर काही पोलिसांसमक्ष सांगितले. न्यायालया समक्ष सांगितले पण त्याने सांगितलेल्या मतानुसार त्याला मदत मिळाली नाही. म्हणून त्यांना तुरुंगात राहावे लागले. मोक्का न्यायालयाने या प्रकरणातील योद्धा नरवाडेला जामीन दिला होता. पण इतर कोणत्याही आरोपीला जामीन देण्यात आला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सर्व आरोपींनी एकत्रितपणे जामीन मिळावा असा अर्ज केला.
या सुनावणीदरम्यान गोविंद कोकुलवार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्याचा वैज्ञानिक अहवाल आला नव्हता. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता आपला निर्णय जाहीर केला असून त्यात सर्व अर्जदार विनोद दिघोरे, वीरु भंडारी, राजू राऊत, लकी उर्फ गुरुचरणसिंग, शेख गुड्डू आणि श्री. पवार या सर्वांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता त्यांचा शासकिय पाहूणचार व तुरुंगवास वाढला आहे. तत्कालीन इतवारा उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक धनंजय पाटील यांनी करुन या आरोपींना अटक केली होती.