कृषिक्रांतीचे प्रणेते : वसंतराव नाईक

vasantrao naik.jpg
vasantrao naik.jpg

नांदेड : राज्याचे ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनिय काम केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. १ जुलै ही त्यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी केल्या जाते. त्यानिमित्त मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी लिहीलेला हा लेख प्रकाशित करीत आहोत.

१ जुलै १९१३ रोजी झाला जन्म
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो. या महनिय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खर्यान अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे. त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान महत्वाचे आहे. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म पुसद तालुक्यातील महुली या गावी १ जुलै १९१३ रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण, पोहरादेवी, उमरी, भोजली, बन्सी आदी गावात झाले. त्यांनी पुढे १९३८ साली नागपुरच्या मॉरिस महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी संपादीत केली तर १९४० साली एल.एल.बी. ही पदवी मिळविली. 

काँग्रेसमध्ये राजकारणाला सुरूवात केली
विद्यार्थी वयातच वसंतराव नाइक यांच्या मनावर महात्मा ज्योतिबा फुले व डेल कार्नेगी यांच्या विचारांची छाप पडली. नागपुरच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी वत्सलाबाई यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. पुढे त्यांना अरूंधती, अविनाश, निरंजन ही तीन आपत्ये झाली. १९४१ साली महात्मा गांधीजी यांच्या चले जाव आंदोलना त्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांची छाप पडली. आंदोलनादरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणाला सुरूवात केली.

पहिल्या विधानसभा निवडणूकीत झाले आमदार
वसंतराव नाइक यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांना पुढे पुसद तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांनी जोडत तालुक्याच्या विकासाला चालना दिली. १९४६ साली त्यांची निवड पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे करत शहराचा चेहरा बदलून टाकला. शहरात बापू बालक मंदिर शाळा उभारून सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाची दरवाजे उघडी केली तर ग्रेन मार्केटच्या माध्यमातून धान्य गंज निर्माण करून शेतकर्यां च्या धान्याला योग्य भाव मिळवून देण्याचे काम केले. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत ते पुसदचे आमदार झाले.

पहिल्यांदा झाले मध्यप्रदेशचे राजस्व उपमंत्री
आमदार म्हणून कार्यरत असताना त्यावेळी विदर्भ हा मध्यप्रदेशात होता. शहराजवळून वाहणाऱ्या पूस नदीवर पूर प्रतिबंधक बांध बांधून त्यांनी पूराच्या पाण्यापासून शहराला सुरक्षित केले. तसेच त्यांनी पाठपुरावा करून महागाव, ढाकणी, बिटरगाव या गावांना जोडणारा रस्ता तयार करून घेतला. पुसद शहरात १९५७ साली पहिल्यांदाच विज आली ती वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांनी आली होती. १९५६ साली त्यांना पहिल्यांदा मध्यप्रदेशात राजस्व उपमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. तर एप्रिल १९५७ ते १९६० दरम्यान त्यांनी कृषिमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे कार्य केले. 

शेतकरी अर्थसक्षम झाला
दरम्यानच्या काळात वसंतराव नाइक यांनी कृषि विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पिक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यामुळे पुढे प्रत्येक जिल्ह्यात कापूस जिनिंग, सुतगिरणी, प्रेसिंग, तेलघाणी आदी सहकारी उद्योगांचे जाळे महाराष्ट्रात उभे राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला. शेतकरी अर्थसक्षम झाला.

१ लाख ३७ एकर शेती भुमिहिनांना दिली
आचार्य विनोबांच्या भुदान चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवून यवतमाळ जिल्ह्यातून त्यांनी १ लाख ३७ एकर शेती दान स्वरूपात मिळवून भुमिहिनांना दिली. राज्यात पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहचविली. १९७२ सालच्या  दुष्काळात त्यांनी अभुतपूर्व काम केले. लागोपाठ तीन वर्षे अवर्षणाचे असल्याने नागरीकांच्या आणि जनावरांच्या अन्नपाण्याचा प्रश्नप निर्माण झाला होता. अशा वेळी त्यांनी देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. सुमारे सात हजारावर विहीरी खोदल्या, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदली. त्यामुळे त्याकाळी ५० लाखावर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला होता.

अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले
संकरीत वाणाच्या गाई, म्हशींची पैदास करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली. त्याचबरोबर दूध डेअरींच्या मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय त्यांनी उभारून दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात कापूस एकाधिकार योजना राबवित कापूस खरेदीतील दलाली बंद करून शेतकऱ्यांच्या हातात अधिकाधिक पैसा कसा जाईल यासाठी प्रयत्न केले. चिकू, द्राक्षे, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी आदी फळपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना फळपिकांकडे आकर्षित केले. त्यांनी आपल्या १९५२ ते १९७९ या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल हे धाडसी उद्गार त्यांनी १९७१ साली पुर्णत्वास आणले.

वयाच्या ६६ व्या वर्षी झाला मृत्यू
त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करून रोजगार हमी योजना देशभरात राबविली. शेतकऱ्यांसाठी अविरत झटणाऱ्या या कार्यधुरंधर नेत्याचा १९७९ साली वयाच्या ६६ व्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक विद्यापीठ हे नाव देण्यात आले. त्यांचे जन्मगाव गहुली आणि पुसदला वसंत स्मारक उभारण्यात आले आहे. नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयात त्यांच्या नावाने सभागृह देखील बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी भटक्या, विमुक्तांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांना समाजभुषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या कृषी विषयक कार्याची दखल घेऊन दरवर्षी १ जुलै या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो.

- शिवश्री कामाजी पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com