नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु

शिवचरण वावळे
Saturday, 29 August 2020

 

देशभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. परंतू उपचाराअंती कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी नाही. कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरातील ॲन्टीबॉडीज तयार झाल्या असल्याने त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यास नांदेडला देखील प्रतिसाद मिळत असून काही जणांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नांदेड - कोरोनाच्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात शनिवारपासून (ता.२९) प्लाझ्मा थेरपी उपचारास सुरुवात झाली असून त्यास प्रतिसादही चांगला मिळत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

कोरोना आजारावर मात करुन २८ दिवस पूर्ण झालेल्या कोरोना मुक्त व्यक्तीच्या अंगात कोरोना आजाराशी लढणाऱ्या अँन्टी बॉडीज तयार झाल्यानंतर त्यांच्याकडून प्लाझ्मा घेता येतो. तो प्लाझ्मा कोरोनाच्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या शरीरात अँन्टी बॉडीज म्हणून सोडण्यास उपयोगी ठरतो. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे.

हेही वाचा - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन ​

आठ कोरोनामुक्त दात्याकडून १६ बँग प्लाझ्मा दान

यापूर्वी जिल्ह्यातील आठ कोरोना मुक्त व्यक्तींने १६ बँग प्लाझ्मा दान केले आहे. त्यानंतर शनिवारी प्रथमच प्रायोगिक तत्वावर दोन कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या शरिरात प्लाझ्मा सोडण्यात आला आहे. आठ कोरोनामुक्त दात्याकडून १६ बँग प्लाझ्मा दान करण्यात आला असून पहिल्या दिवशी दोन रुग्णांना ही थेरपी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित मध्यम अशा स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार व्हावेत, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले होते. यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धोडिंबा भुरके, डॉ. शीतल राठोड, डॉ. समीर, डॉ. संज्योत गिरी यांच्या उपस्थितीत दोन रुग्णांना प्लाझ्मा (रक्त) देण्यात आला.

हेही वाचा - नांदेड - प्रवेश घ्यायचा असेलतर विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी घ्या, महाविद्यालयांची शक्कल ​

कोरोनामुक्त दात्याकडून प्रतिसाद मिळला नाही

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. असे असले तरी, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा दान करण्यासाठी अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. प्लाझ्मा दान हे रक्तदान करण्यासारखेच असले तरी, प्लाझ्मा दान चळवळ किंवा त्याबद्दल फारशी जागरुकता झाली नसल्याने या चळवळीस कोरोनामुक्त दात्याकडून प्रतिसाद मिळला नाही. यासाठी शासकीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.

दात्यांनी स्वतःहून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे.
ज्या कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात करुन २८ दिवस पूर्ण केले आहेत. अशा कोरोना दात्यांनी इतरांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःहून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. त्यांच्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.
- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plasma Therapy Treatment Starts From Today At Nanded Medical College Nanded News