esakal | धक्कादायक! नांदेडात शालेय पोषण आहारात आढळले प्लॉस्टिकयुक्त तांदूळ
sakal

बोलून बातमी शोधा

plastic rice

नांदेडात शालेय पोषण आहारात आढळले प्लॉस्टिकयुक्त तांदूळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर (नांदेड): तालुक्यातील टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॉस्टिक मिश्रित तांदुळ आढळून आले आहेत. ही बाब गुरुवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन तांदळाची पाहणी केली आहे. सदर तांदुळाचे वाटप करू नये आणि पाल्यांच्या जीवनाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षणपद्धती चालू आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. कोरोना काळाच्या अगोदर शाळेतच भात शिजवून वाटप करण्यात येत होता. आता शालेय पोषण आहार घरपोच देण्याचे काम चालू आहे. (plastic rice found in nanded zp school)

गुरुवारी टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून तांदुळाचे वाटप करण्यात आले. या तांदळात प्लॉस्टिकचे मिक्स तांदुळ आढळून आले. ही बाब गावात कळाल्यावर पालकांनी शाळेत धाव घेऊन चौकशी केली. काही पालकांनी सदरचे तांदुळ चावून बघितले असता ते चावत नव्हते. फक्त दाताखाली चपटे होत असल्याचे दिसून आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच पुन्हा दुसरा प्रयोग म्हणून गावकऱ्यांनी तेच तांदुळ जाळले असता ते सरपणासारखे जळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले. याबाबत चौकशी करण्याची मागणी सरपंच यांचे पती कानबा पोपलवार, दिगंबर मुतनेपवाड, अर्जुन आलेवाड, दिपक भगत, प्रशांत पवार, रवी विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: IPO Update: 4 ऑगस्टला होणार Windlas Biotech चा आयपीओ लॉंच

याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी वानोळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता ते म्हणाले की, पोषण आहारात प्लॉस्टिकयुक्त तांदुळ आढळणे ही बाब गंभीर आहे. या सर्व बाबींची चौकशी करून वरिष्ठांकडे माहिती व ते तांदुळ पाठवून संबंधितावर जिल्हा शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

loading image
go to top