नांदेड : जबरी चोरी करणाऱ्यांना पोलिस कोठडी 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 13 September 2020

अष्टविनायकनगर येथे एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट टाकून १३ लाख लंपास केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्याला न्यायालयाने ता. १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : शहरात जबरी चोरी करुन तेलंगणात जावून राहणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना नांदेड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून रोख सात लाख २० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बुधवारी (ता. नऊ) इचोडा ता. बोत, जिल्हा अदिलाबाद येथे रात्री केली. अष्टविनायकनगर येथे एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट टाकून १३ लाख लंपास केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्याला न्यायालयाने ता. १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड शहरात मागील काळामध्ये मालाविषयीच्या गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना देऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी अशा गुन्हेगारावर कारवाई करुन यावर्षी १०४ मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यातून ३७ लाख १५ हजार ६७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

हेही वाचा -  खा. हेमंत पाटील यांच्या पत्राने आरोग्य व महापालिका प्रशासनाला घाम, काय आहे पत्रात ?

अष्टविनायकनगरमध्ये बॅग लिफ्टींग करणाऱ्यांना अटक

वाढत्या गुन्ह्याच्या घटनांचा उलगडा होत नसल्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या सर्वच यंत्रणेला सतर्क केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी अष्टविनायकनगर भागात ता. २० आॅगस्ट रोजी झालेल्या जबरी चोरीचा शोध स्वत : कडे घेतला. गोपनीय माहितीवरुन श्री. चिखलीकर यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार गोविंद मुंडे, हवालदार संजय केंद्रे, शेख चॉंद, सुरेश घुगे, विठ्ठल शेळके आणि हनुमंतसिंग ठाकूर यांना सोबत घेतले. 

रोख रक्कमेसह दोघांनाही भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन 

या पथकानी ता. आठ सप्टेंबर रोजी तेलंगनातील इचोडा या गाव शिवारात सापळा रचला. अदिलाबाद पोलिसांच्या मदतीने दबा धरुन बसलेले संपत रामकिशन मुंडे (वय २३) रा. इचोडा (तेलंगना) आणि महेश नारायण वजिरगावे (वय २०) रा. मरवाळी ता. नायगाव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख सात लाख २० हजार रुपये जप्त केले. गुन्ह्यात वापरलेल्या एका स्कुटीसह त्यांना गुरुवारी (ता. १०) सकाळी नांदेडला आणले. त्यांची कसुन चौकशी केल्यानंतर रोख रक्कमेसह दोघांनाही भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. या पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody for burglars nanded news