
याप्रकरणी तिघांविरुद्ध तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
तामसा (जिल्हा नांदेड) : तामसा येथील वार्ड क्रमांक एकमधील अवैधरित्या चालू असलेल्या कत्तलखान्यात पोलिसांनी शनिवारी (ता. २३) सकाळी धाड टाकून साडेतेरा क्विंटल गोमांस जप्त केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
चिडलेल्या जमावानी काहीजणांना मारहाण केल्याने घटनास्थळावरुन गुरे गायब करण्यात आली आहेत. येथील कथित कत्तलखान्यात अवैधरित्या विनापरवानगी गोवंशाची हत्या करुन गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी शनिवारी पहाटेच सापळा रचून संबंधित ठिकाणावर धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन दोन लक्ष ६२ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त करुन तिघांना ताब्यात घेण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा - तरुणावर प्राणघातक हल्ला; नांदेडच्या बारडध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी शफी तकसीर खाटीक, निसार याकूब खाटीक, मोमीन मुसा खाटीक सर्व रा. तामसा यांना अवैधरित्या व विनापरवानगी गोवंशाची कत्तल करुन गोमांस विकण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन कार्यवाही केली. यावेळी पोलिसांसमोरच जमलेल्या जमावाकडून काहीजणांना मारहाण झाल्यामुळे वातावरणात तणाव झाला. पोलिसांना देखील जमाव आक्रमक होण्याचा अंदाज नव्हता. कारवाईनंतर उद्भवणाऱ्या तनावाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळ परिसर व शहरातील अन्य ठिकाणी दिवसभर खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गोमांस जप्त करण्याच्या घटनेनंतर एक ते दीड तासांनी जमाव होण्यास कारणीभूत असणाऱ्यांचा शोध घेऊन चिथावणीखोरांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत शांतता राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे यांनी केले आहे. याप्रकरणी नामदेव मद्दे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे