नायगावच्या खैरगाव येथे ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी उद्या रविवारी मतदान

प्रभाकर लखपत्रेवार
Saturday, 16 January 2021

मतदान पत्रिका छपाईच्या वेळी सदरचा प्रकार घडल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रविवारी ( ता. १७)  रोजी एका जागेसाठी पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी लोंढे यांनी दिली आहे. 

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील खैरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना ता. ४ जानेवारी रोजी चिन्हाचे वाटप करण्यात आले पण मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान यंत्रामध्ये नावच नसल्याने खळबळ उडाली. मतदान पत्रिका छपाईच्या वेळी सदरचा प्रकार घडल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रविवारी ( ता. १७)  रोजी एका जागेसाठी पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी लोंढे यांनी दिली आहे. 

नायगाव तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले असले तरी खैरगाव येथील एका उमेदवाराची मात्र झोप उडाली आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील एक जागा ही सर्वसाधारण प्रवर्गातील महीलेसाठी राखीव आहे. या जागेवर ललिता शंकरराव घंटेवाड या अपक्ष मैदानात होत्या. त्यांना पंखा ही निशाणी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातून प्रचारही केला मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.  मात्र ता. १५ जानेवारी रोजी मतदानाच्या वेळी प्रभाग ३ मध्ये  ललिता घंटेवाड यांचे नावच मतदान यंत्राच्या मतपत्रीकेत नावच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आली.

हेही वाचाजिंतूरची लेक अंजली कोला मिसेस एशिया युनिव्हर्सची मानकरी; जगभरातून आलेल्या ६० महिलांमध्ये पटकावले अव्वल स्थान

या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने दखल घेतली असून खैरगाव येथील प्रभाग ३ मधील एका जागेसाठी आज रविवारी (ता. १७) रोजी सकाळी ७. ३० ते ५. ३० दरम्यान मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती नायगाव तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार लोंढे यांनी दिली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling for a Gram Panchayat seat at Khairgaon in Naigaon will be held on Sunday nanded news