
२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत असून, माध्यमिक प्रमाणेच प्राथमिकच्या नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणी होणार आहे.
नांदेड ः नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासोबतच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार सुरु केली असून, जिल्ह्यातील नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणीचेही नियोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळांचे दरवाजे प्रजासत्ताक दिनानंतर उघडले जाणार आहे. जवळपास १० महिने घरीच बसून आॅनलाइन शिक्षण घेत असलेल्या अनेक मुलांना शाळेत जाण्याची घाई आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसल्यामुळे पालकांच्या मनात मुलांना शाळेत पाठविण्याच्या संदर्भात धाकधूक निर्माण झाली आहे. दरम्यान शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय दोन वेळेस रद्द केला होता. मात्र, आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्यात येणार असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरु केली आहे.
हेही वाचा - Motivational Story : नांदेड जिल्ह्यातील बहिणी- बहिणीची शेती !
शाळांचे निर्जंतुकीकरणाचे काम सुरु
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेतला आहे. शाळांच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शक सूचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, स्वच्छतागृहाची साफसफाई, पिण्याची पाणी, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आदी विषयांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४२ हजार १९ इतकी पाचवी ते आठवीची विद्यार्थी संख्या असून नऊ हजार ५०० शिक्षक आहेत.
येथे क्लिक करा - ग्रामपंचायत निकाल : चार दिवस नव्हे, आता पाच वर्ष सासूचे; चुरशीच्या लढतीत सुनेला चार मतांनी हरवलं
पालकांच्या संमतीनंतरच वाजणार घंटा
राज्यात बाधितांची संख्या कमी होत असल्याने टप्याटप्याने शाळा सुरु केल्या जात आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आले. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत आहेत. मात्र, पालकांच्या संमतीनंतरच ‘पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजणार आहे.
जिल्ह्यातील नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांचे सहा हजार ७०८ शिक्षक आहेत. शासनाच्या निर्देशानुसार २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन केले जात आहे.
- प्रशांत दीग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नांदेड.
संपादन- प्रल्हाद कांबळे