Video - सिडकोतील नागरिकांच्या मरणयातना संपेनात, काय आहे कारण?

श्याम जाधव
सोमवार, 6 जुलै 2020

पूर्वी सिडको मनपात नसताना रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांचा प्रश्न गंभीर नव्हता. मात्र, सध्या महापालिकेमध्ये असतानाही सिडकोतील समस्या सुटल्या नाहीतच. उलट त्या गुंतागुंतीच्या होत आहेत. महापालिकेची ही उदासिनता आज नागरिकांची डोके दुखी बनली आहे.

नवीन नांदेड : महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे तसेच दृष्टिहिन अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सिडकोतील नागरिकांना दररोज मरणयातना भोगाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे अनेकदा आवाज उठवूनही कुंभकर्णी झोपेत असलेले महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही, हेच आमचे दुर्दैव असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

सद्यस्थितीत सिडकोत अंतर्गत रस्त्याची वाट बिकट झालेली आहे.  झपाट्याने विकसित न होणाऱ्या सिडको परिसरात रस्त्यांसोबतच विविध समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले असून, परिसरातील काही मुख्य रस्त्ते सोडले तर अंतर्गत रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सिडको परिसरातील  अनेक भागात अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. यामुळे वाहनचालकांसह, पायी चालणारे नागरिक, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधित त्रास सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा - कोरोना@४४० ः नांदेडला आज पुन्हा तीन पॉझिटिव्ह

कर भरूनही सुविधा नाहीत
महापालिका प्रशासनाने तातडीने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत अनेकदा नागरिकांनी आवाज उठवलेला आहे.  परंतु, महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी, महापालिकेमध्ये कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे सिडको-हडकोतील नागरिकांना गप-गुमाने समस्यांना सामोरे गेल्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नाही. सिडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यानंतर मनपाच्या तिजोरीत पडणारा वाटा भक्कम असतानाही, त्या तुलनेत सिडको-हडकोतील रहिवाशांना सुविधाच मिळत नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. 

हे देखील वाचाच - परभणी ब्रेकींग : सोमवारी सकाळीच आढळले सात नवे रुग्ण

समस्यांच्या संघर्ष झाला रोजचाच
सिडको महापालिकेत समाविष्ट होवून सुमारे १५ वर्ष झालीत. तरी देखील नागरिकांना मूलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत.  काही भागात रस्त्यांची कामे झालेली असली तरी अजूनही अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकटच आहे.  अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येत आहे. हडको भागातील मुख्य रस्ता ते पाण्याची टाकी, शिवाजी उद्यान ते महात्मा बसस्वेश्वर चौक यासह अनेक भागात अंतर्गत रस्ते खराब झालेले आहेत.

महापालिकेने ठोस पावले उचलावीत
नागरिकांना व लहान मुलांना, आबाल वृद्ध तसेच दुचाकी धारकांना रस्त्याने ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. अजून मोठा पाऊस झाला नाही मात्र पावसानंतर अजून मोठ्या प्रमाणात रस्त्याची चाळण होऊ शकते, त्यामुळे तातडीने ठोस कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- भागीरथी बच्चेवार (ज्येष्ठ नागरिक, सिडको)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Problems Of The Citizens Of CIDCO Are Not Solved Nanded News