जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयात जादुटोना प्रतिबंध कायद्यांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा 

file photo
file photo

नांदेड : येथील जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको यांच्या वतीने ता. एक फेब्रुवारी रोजी जादुटोना प्रतिबंध कायदा 2013 या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स कॉलेजचे प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे व महाविद्यालयातील प्रा. डॉ. मनीषा मांजरमकर ह्या उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे म्हणाले की, जादुटोना प्रतिबंध कायद्याचा मुख्य उद्देश हा शोषण मुक्त समाज निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शतकोनी शतके अंधश्रद्धेचा पगडा समाजावर राहिलेला आहे. अंधश्रद्धेमुळे गरीब जनतेची पिळवणूक होते. ते आणखीनच दारिद्र्यात लोटले जातात. याबाबत शासन दरबारी 20 वर्षे प्रयत्न करून अंधश्रद्धा निर्मुलन समिती व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून ता. 20 डिसेंबर 2013 रोजी जादुटोना प्रतिबंध कायदा 2013 हा पारित झाला. या कायद्याच्या व त्यातील वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रतिबंध घातला आहे. भूत, भानामती करणे, चमत्कार करणे, गुप्तधन, नरबळी, दैवीशक्ती, चेटूक करणे, करणी करणे या माध्यमातून लोकांना भीती घालणे, अघोरी प्रथा करणाऱ्यांना या कायद्यान्वये सहा महिने व सात वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा व वाच हजार रूपये ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो, असे प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले.

तसेच त्यांनी स्वत: चे काही अनुभवही या ठिकाणी सांगितले. आजीने स्वत: च्या नातीचा आपल्याच मुलाच्या हाताने नरबळी दिला आहे. म्हणजे लोक हे इतके टोकाचे अंधश्रद्धाळू आहेत. अशा अमानुष घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालतात. तसेच काही भोंदू बाबा स्वत:चे पोट भरण्यासाठी, स्वार्थासाठी वेगवेगळे चमत्कार करुन दाखवतात, ते सुद्धा या कायद्यान्वये दोषी ठरतात, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

तसेच डॉ. मनीषा मांजरमकर यांनी जादुटोना प्रतिबंध कायद्यात समाजकार्यकर्त्याची भूमिका या विषयी बोलताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना समाजकार्य पद्धतीचे ज्ञान असल्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्षरीत्या करु शकतात. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, भित्तीपद्धके, स्लोगनस्‌ इत्यादींच्या माध्यमांतून जादुटोना प्रतिबंध कायद्याची जनजागृती प्रभावीपणे करू शकतात, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डब्ल्यू.आर. मुजावर यांनी जादुटोना प्रतिबंध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे व हा कायदा समाजाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या धाकामुळे महाराष्ट्रात अंधश्रद्धा कमी होत आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. सी. दोरवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप काठोडे यांनी केले, तर आभार प्रा. विद्याधर रेड्डी यांनी मानले. या ऑनलाईन कार्यशाळेत एकूण 127 विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. निरंजनकौर सरदार, प्रा.डॉ. अशोक वलेकर, प्रा. डॉ. प्रतिभा लोखंडे, प्रा. डॉ. अंबादास कर्डिले, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. डॉ. मेघराज कपूर, प्रा. सुनील गोईनवाड, प्रा. डॉ. ए. ए. शेख, प्रा. सत्वशिला वरगंटे, प्रा. गोपाल बडगिरे, ग्रंथपाल सुनील राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com