विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करा- खासदार हेमंत पाटील

प्रल्हाद कांबळे
Monday, 17 August 2020

विष्णुपूरीतून पाणी सोडण्यापूर्वी त्यांतर्गत येणारे तलाव भरुन घ्यावे त्यानंतरच पाणी नदीपात्रात सोडावे अशा सुचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

नांदेड : गोदावरी नदीवर असलेल्या १०० टक्के भरलेल्या विष्णुपूरीतून पाणी सोडण्यापूर्वी त्यांतर्गत येणारे तलाव भरुन घ्यावे त्यानंतरच पाणी नदीपात्रात सोडावे अशा सुचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. कारण हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधला जरी असला तरी त्यावर आज नांदेडची तहाण भागते. म्हणून पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे. 

विष्णुपूरी प्रकल्पात वरच्या भागातून आलेले पाणी पुढे सोडण्याची घाई न करता या प्रकल्पावरील डेरला, सोनखेड यासह आदी पाच ते दहा तलाव भरून घ्यावे आणि नंतरच पाण्याचा विसर्ग करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी दिल्या आहेत. नांदेड शहर आणि नांदेड जवळील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशय यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला आहे. याआधी विष्णुपूरी प्रकल्प भरल्यानंतर त्यातून पाणी सोडण्यात आले. परंतु प्रकल्पावरील सर्व सिंचन तलाव भरल्याशिवाय पाणी सोडणे योग्य नव्हे असे खासदार हेमंत पाटील यांनी म्हंटले आहे. 

हेही वाचा जगतज्योती महात्मा बसवेश्वर समतेचे पुजारी- अशोक चव्हाण

लाभक्षेत्रात असलेले तलाव मात्र अद्यापही भरले नाहीत

विष्णुपूरीच्या पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यापेक्षा त्या अंतर्गत येणारे डेरला, सोनखेड आणि इतर दहा तलाव शेती आणि पिण्यासाठी भरून घेतले तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उद्भवणार नाही. तसेच या परिसरातील रब्बी हंगामालाही पाणी मिळेल. यंदाच्या पावसाळ्यात विष्णुपूरी आणि गोदावरी नदी पात्राच्या वरच्या भागात पाऊस चांगला झाल्याने विष्णुपूरी जलाशयातील पाण्याचा आवक मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु जलाशयाच्या लाभक्षेत्रात असलेले तलाव मात्र अद्यापही भरले नाहीत. पावसाचे दिवस संपत आल्याने यापुढे पाऊस होईल की नाही याबाबत साशंकता आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

येथे क्लिक करा -  देशाची एकात्मता, अखंडता अबाधीत राखण्यासाठी सुरक्षा बलांची आवश्यकता- कमांडंट लीलाधर महरानिया

विष्णुपूरीचे पाणी असे वाया जाऊ देऊ नये 

त्याकरिता रब्बी हंगामाचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे. विष्णुपूरी जलाशयातील पाण्याचा उपयोग लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होण्याऐवजी तेलंगणा राज्यातील पोचमपाड प्रकल्पाला होत आहे. ही बाब लक्षात घेता खासदार हेमंत पाटील यांनी विष्णुपूरीचे पाणी असे वाया जाऊ देऊ नये अशा सुचना करताना लाभक्षेत्रातील डेरला लिफ्ट सुरू करून सोनखेड, पांगरी, डेरला, खुपसरवडी, टाकळगाव, शंभरगाव, वाका, बेटकर वाळकी, वाळकी, मारतळा या परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पाटबंधारे महामंडळाचे अधिकाऱ्यांना खासदार हेमंत पाटील यांनी सुचना केल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proper planning of water in Vishnupuri project MP Hemant Patil nanded news