कोरोना आपत्ती काळात गुरुद्वारा बोर्डास आर्थिक मदत द्या- शीख समाजाची मुख्यमंत्र्याकडे मागणी

प्रल्हाद कांबळे
Friday, 17 July 2020

मार्च 2020 पासून गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड संस्था मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून राज्य शासनाने गुरुद्वारा संस्थेस खर्च भागवण्यासाठी शंभर कोटींची आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरूवात करावी.

नांदेड : देशात कोरोना कोविड- 19 संक्रमण प्रसारित झाल्याने गुरुद्वारात भाविकांच्या संख्येत घट झाली. मार्च 2020 पासून गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड संस्था मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून राज्य शासनाने गुरुद्वारा संस्थेस खर्च भागवण्यासाठी शंभर कोटींची आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरूवात करावी अशी मागणी शीख समाजाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  

निवेदनावर मागणीकर्ता स. लखनसिंघ लांगरी, स. मनबीरसिंघ ग्रंथि, स. गगनदीपसिंघ रामगडिया, स. जोगिंदरसिंघ सरदार, स. गुरमीतसिंघ टमाना,       सरताजसिंघ सुखमनी आदींच्या सह्या आहेत. वरील निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री     बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत पाटिल, खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर, जिल्हाधिकारी डाॅ. विपीन आणि गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - नांदेडातील धक्कादायक प्रकार : सोन्यासाठी महिलेचे तोडले कान

कोरोना संक्रमनामुळे गुरुद्वारा संस्थेची मोठी आर्थिक कोंडी

प्रस्तुत निवेदनात पुढे नमूद आहे की, कोरोना संक्रमनामुळे गुरुद्वारा संस्थेची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून प्रति महीना     नऊ ते दहा कोटी रूपये अनुदान घटले आहे. पुढे पाच- सहा महीने अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे गुरुद्वाराला या आर्थिक वर्षात अनुदान     मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे. गुरुद्वाराचा सर्व कारभार दानपेटी आणि इतर स्वरूपाच्या अनुदानवार अवलंबून आहे. संस्थेकडे शहर आणि लगतच्या परिसरात दहा ते बारा गुरुद्वारांचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे. गुरुद्वारांच्या नियोजन, सुरक्षा, विजबिल, पानी, लंगर व अन्य सुविधांवर प्रतिमाह      कोट्यावधी खर्च येतो. तसेच संस्थेत कार्यरत दीड हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर प्रतिमाह तीन कोटींचा खर्च होतो. 

राज्य शासनाने शंभर कोटींचा आर्थिक अनुदान मदत स्वरूपात द्यावा

तसेच गुरुद्वारांच्या वेगवेगळ्या आठ ते दहा यात्रीनिवासांच्या व्यवस्थेसाठी मोठा खर्च करण्यात येतो. सध्या गुरुद्वाराच्या वातानुकूलित एन. आर. आय.    यात्री निवास, पंजाब भवन शासनाने कोविड 19 उपचार केंद्र म्हणून अधिगृहित केलेली आहेत. त्याच्या व्यवस्थापनावर मोठा खर्च होत आहे. शिवाय      दैनंदिन पूजापाठ, लंगर, सुरक्षा आदींवर कोट्यावधींचे खर्च होत आहे. यामुळे गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्था मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. गुरुद्वारा संस्था अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित आहे. कोविड संक्रमण काळात देखील लाखों गरिबांना घरपोच लंगर सेवा देण्यात आली.   समाजातील गरीब व गरजूंना तीन ते चार महिन्यांचे रेशन वितरित करण्यात आले. वैद्यकीय सेवांचा पुरवठा करण्यात आला. शैक्षणिक उपक्रम सतत     सुरु असतात. नेहमीच शासन आणि जनतेला मदत करणाऱ्या या संस्थेला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत या विश्वप्रसिद्ध     धार्मिक संस्थेस राज्य शासनाने शंभर कोटींचा आर्थिक अनुदान मदत स्वरूपात द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide financial assistance to Gurdwara Board during Corona disaster- Demand of Sikh community to the Chief Minister nanded news