बीजोत्पादन कार्यक्रमातून मिळणार गुणवत्तापूर्ण बियाणे

soyabean.jpg
soyabean.jpg

नांदेड  : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजकडून यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात दोन हजार २५९ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात सोयाबीन दोन हजार १३८ हेक्टर, कपाशी ७६ हेक्टर, उडीद ४० हेक्टर व ज्वारी पाच हेक्टर असा एकूण दोन हजार २५९ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.  

बीजोत्पदनाची गरज
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाण्याची गरज जिल्ह्यात भागावी, या करीता जिल्ह्यांत बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. याकरिता संबंधित जिल्ह्यातील त्या पीक वाणाची मागणी, उत्पादकता, शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमातील सहभाग, महामंडळाची त्या भागातील बियाणे साठवणूक व प्रक्रियाक्षमता आणि जिल्ह्यातील सर्वसाधारण नैसर्गिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करून, पीक निहाय बीजोत्पादन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. बीजोत्पादन कार्यक्रमातील उत्पादित बियाण्याचे खेरदी धोरण प्रत्येक हंगामापूर्वीच महामंडळाद्वारे जाहीर करण्यात येत असल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमामधील सहभाग वाढत आहे.

शेतकऱ्यांना मिळतो २५ टक्के जादा दर
बीजोत्पादनामधील सहभागमुळे राज्यातील बीजोत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के अधिक दर मिळत असल्यामुळे बीजोत्पादकांनी केलेल्या विविध पीक वाणांच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे रास्तदरात उपलब्ध होत आहे. बीजोत्पादन कार्यकमांतर्गत बियाणे खरेदी धोरण जिल्हानिहाय निवडक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पिकनिहाय पूर्वघोषित कालावधीतील दररोजच्या उच्चतम दराचा सरासरी दर अधिक पिकनिहाय २५ टक्के प्रोत्साहनपर दिला जातो. 

सोयाबीनचा २१३८ हेक्टरवर बीजोत्पादन
जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. अशावेळी बियाणची गरजही दरवर्षी वाढत आहे. यंदा आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होइल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यात तीस हजार क्विंटल बियाणे आवश्यक आहे. यामुळे बीजोत्पादन कार्यक्रम वाढविण्याची गरज व्यक्त होत होती. जिल्ह्यात यंदा दोन हजार २५९ हेक्टरवर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात जेएस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस १५८, एमएयुएस १६२ एमएयुएस ७१ या वानाचा बीजोत्पादन कार्यक्रमात समावेश आहे.     

बीटी कपाशीचे बीजोत्पादन 
राज्यातील कापूस क्षेत्र बीटी कापूस लागवडीखाली आल्यामुळे तसेच कृषि विद्यापीठांनी प्रसारित केलेले संकरित कापूस वाण बीटीरुपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संकरित कपाशी एनएचएच-४४, एनएचएच १६५ व इतर संशोधित संकरित कपाशी वाणामध्ये बोलगार्ड-२ जनुक वापरून बीटी कपाशीचे बियाणे बीजोत्पादनाचा ७६ हेक्टरवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

उडीद तसेच ज्वारीचे बीजोत्पादन
जिल्ह्यात उडीद तसेच ज्वारीचे बीजोत्पादन कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. यात चाळीस हेक्टरवर उडदाचा बीजोत्पादन राबविण्यात येणार आहे. तर पाच हेक्टरवर खरीप ज्वारीचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. 

गुणवत्ता पूर्ण बियाणे उत्पादन करावे

जिल्ह्याचे सोयाबीन पेरणीक्षेत्र लक्षात घेता जिल्ह्याला तीस हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होवून गुणवत्ता पूर्ण बियाणे उत्पादन करावे.
- अशोक निकम
जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नांदेड.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com